Breaking News

खालपला अज्ञात रोगाने 32 मेंढ्या मेल्या तर 50 हुन अधिक मेंढ्याना या रोगाची लागण

देवळा/वार्ताहर
तालुक्यातील खालप  शिवारात अज्ञात रोगामुळे सुमारे 32 पेक्षा जास्त मेंढ्या मरण पावल्या असून 50 पेक्षा अधिक मेंढ्यांना या रोगाची लागण झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. यामुळे मेंढपाळ वर्गात चिंतेचे वातावरण असून या रोगाची लागण इतर मेंढ्यांना व कळपाला होऊ नये म्हणून  प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. 
ठेंगोडा ता.बागलाण येथील संजय झाडे व अभिमन झाडे यांच्या मालकीच्या 150 मेंढ्या असून देवळा तालुक्यात खालप शिवारात त्यांचे वाडे बसत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून या मेंढ्यांवर अज्ञात रोगाने आक्रमण केल्याने चालत्या - फिरत्या मेंढ्या रोगग्रस्त होत मरत आहेत. आतापर्यंत 32 मेंढ्या या रोगाची शिकार होत मृत्युमुखी पडल्या असून इतर 50 पेक्षा अधिक या रोगाने क्षतिग्रस्त आहेत. पशुवैद्यकानीं तपासणी करत मेंढ्यांवर उपचार केले पण या रोगाचे निदान सापडले नाही. यामुळे उपचारास प्रतिसाद मिळत नसल्याचे पशुवैद्यक भाऊसाहेब वाणले यांनी सांगितले.
सध्या दुष्काळी स्थिती असून अद्याप पाहिजे तसा मोठा पाऊस न झाल्याने चारा व पाण्याची वानवाच आहे. त्यात असे नुकसान झाल्याने झाडे कुटुंबीय निराशेच्या गर्तेत सापडले आहे. या मृत मेंढ्यांचा तातडीने पंचनामा करून या मेंढपाळांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी धनगर वर्गाने व शेतकर्‍यांनी केली आहे.