Breaking News

भुजबळ दुसर्‍या मतदारसंघाच्या शोधात


राज्यातील राष्ट्रवादी काँगे्रसचे दिग्गज नेते, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबख यांची येवला मतदारसंघातील सिद्धी संपल्यातच जमा आहे. ओबीसींची वकिली या सदरांतून आम्ही वेळोवेळी भुजबळांना सावध करत इशारा दिला होता. भुजबळांचा येवला आणि त्यांचा मुलगा पंकज भुजबळांचा नांदगाव मतदारसंघात त्यांच्यासमोरच तगडे आव्हान युतीच्या उमेदवारांनी निर्माण केले आहे. त्याचाच परिणाम म्हणजे, भुजबळ दुसर्‍या सुरक्षित मतदारसंघाच्या शोधात आहे. 
छगन भुजबळ हे गेल्या तीन टर्मपासून येवला मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. यंदा मात्र ते वैजापूर या औरंगाबाद जिल्ह्यातील मतदारसंघाची चाचपणी करत असल्याची चर्चा आहे. कारण नाशिक जिल्ह्यात भुजबळांनी बसवलेले बस्तान, आता यापुढे फोडा आणि झोडा नीतिवर चालणारे नाही. कारण भुजबळांनी नाशिक जिल्ह्यात कोणतेही भरीव काम केलेले नाही. ओबींसी समाज तोंडी लावण्यापुरता त्यांनी ओबीसींच्या नामाचा जागर सुरू ठेवला. मात्र येवला मतदारसंघाजत देखील ओबीसी नामाचा जागर चालतांना दिसून येत नाही. कारण ओबीसी समाज भुजबळांपासून केव्हाच दुरावला आहे. त्यामुळे आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरूंग लागण्याची जाणीव भुजबळांना झालेली आहे. त्यामुळेच भुजबळ येवला मतदारसंघातून पळ काढत, दुसरा मतदारसंघ शोधतांना दिसून येत आहे.  येवला मतदारसंघात निर्माण झालेले आव्हान लक्षात घेता छगन भुजबळ यांनी दुसर्‍या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा विचार करत आहेत. कारण या मतदारसंघात शिवसेनेकडून चांगली बांधणी करण्यात आली आहे. तसेच जेलवारी केल्यानंतर भुजबळ यांच्या राजकीय वर्चस्वालाही धक्का बसला आहे. 
शिवसेनेकडून 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भुजबळांना संभाजी पवारांनी मोठे आव्हान दिले होते. भुजबळांकडून दुखावलेल्या माजी आमदार मारोतराव पवार यांनी आपल्या पुतण्या संभाजीला शिवसेनेत पाठवून चांगली मते मिळविली. सेनेत त्यावेळी तालुक्यातील 4 नेत्यांपैकी एकटेच मारोतराव होते. आता परिस्थिती याउलट आहे. नरेंद्र व किशोर दराडे हे बंधू सेनेत आले असून ‘आमदारकी’ची धुराही समर्थपणे वाहत आहेत. त्यामुळे सेनेचे पारडे आणखी जड झाले आहे. पंचायत समिती व नगरपरिषदेची सत्ताही भुजबळांच्या ताब्यातून सेनेने काढून घेतली आहेत. जिल्हा परिषदेच्या तालुक्यातील 5 पैकी 3 जागा सेनेकडे आहेत. सेनेकडून गतवेळेस कडवी लढत दिलेल्या संभाजी पवारांनी 5 वर्षात संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत तयारी केलेली आहे. त्यामुळे भुजबळांचे राजकीय कारकीर्द धोक्यात आलेली आहे. भुजबळांनी सत्ता असतांना कधीही कार्यकर्त्यांचा विचार केला नाही. केवळ कार्यकर्त्यांचा वापर राजकीय फायद्यासाठी नेहमीच केला. त्यामुळे कार्यकर्ते भुजबळांपासून नेहमी दूरावतांना दिसून येत आहे. त्यामुळे भुजबळांपुढे येवला मतदारसंघात तगडे आव्हान निर्माण केले जात आहे. युतीत ही जागा सेनेकडे असून संभाजी पवार व रूपचंद भागवत हे इच्छुक आहेत. आघाडीत ही जागा 2004 पासून भुजबळांमुळे राष्ट्रवादीकडे जागा आहे. अ‍ॅड. माणिकराव शिंदे यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. काँग्रेसकडून माजी आमदार जनार्दन पाटील यांच्या कन्या रश्मी पालवे या उमेदवारीसाठी प्रयत्नशील असून पक्षाला जागा न मिळाल्यास दुसर्‍या पक्षाची उमेदवारी घेऊ असे पालवे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे येवला मतदारसंघातील निवडणूक आपल्या जड जाणार याची जाणीव भुजबळांना झालेली आहे. त्यामुळे त्यांनी दुसर्‍या मतदारसंघात शोधमोहीम सुरू केली आहे. भुजबळांनी सातत्याने ओबीसी जातीचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला. मात्र भुजबळ कधीही समरस झाले नाही. ते केवळ एका जातींचा विचार करण्यातच गुंतले. परिणामी ओबीसी समाजातील छोटया-छोटया जातींची मोट बांधण्याचे काम भुजबळांनी केले नाही. त्यामुळे ओबीसी समाजांची हक्कांची मते देखील भुजबळांना पडणार नाही, याची त्यांना जाणीव झालेली आहे. त्यामुळे मतदारसंघ बदलून पुन्हा एकदा नवीन राजकीय इनिंग खेळण्याची इच्छा भुजबळांची आहे. मात्र कर्माची फळे आपला पिच्छा सोडत नाही. येवला मतदारासंघातील शुक्लकाष्ट दुसरा मतदारसंघ शोधल्यानंतर तरी कसे सुटणार.