Breaking News

एमएमआरडीए बेस्टला देणार हायब्रीड बस

मुंबई
वांद्रे-कुर्ला संकुलापासून पूर्व, पश्‍चिम उपनगर आणि नव्या मुंबईपर्यंत सुरू केलेली एसी हायब्रिड बस सेवा बेस्टकडे सुपूर्द करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. प्रवाशांची अत्यल्प संख्या, रिकाम्या फेर्‍या आणि त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार 25 हायब्रिड बस बेस्टच्या ताफ्यात सामिल होतील. बेस्टच्या नव्या तिकीट धोरणानुसार या बस चालवल्यास प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळू शकतो.
संकुलातील सरकारी व खासगी कंपन्यांच्या कार्यालयांच्या संख्येत मागील काही वर्षांत भरपूर वाढ झाली आहे. संकुल हे कुर्ला व वांद्रे या दोन्ही स्थानकांच्या मध्यभागी असल्याने लोकलने कुर्ला व वांद्रे येथे उतरून शेअर रिक्षा किंवा बसच्या माध्यमातून संकुलात येता येते. मात्र, अनेकांना रिक्षाचा खर्च परवडत नाही व बसेस सेवा जास्त अंतराने असल्याने ती गैरसोयीची ठरते, याकडे संकुलातील प्रॉपर्टी ओनर्स असोसएशिनने लक्ष वेधत व कर्मचार्‍यांसाठी वांद्रे व कुर्ला स्थानक ते संकुल एसी बस सेवा सुरू करण्याची विनंती एमएमआरडीएला केली होती.
एमएमआरडीएने या विनंतीनुसार संकुल ते बोरिवली, ठाणे, मुलुंड व खारघर अशी थेट सेवा सकाळी व संध्याकाळच्या वेळेत सुरू केली. उर्वरित वेळेत संकुल ते वांद्रे, कुर्ला व सायन स्थानक अशी सेवा सुरू केली. परंतु या बसचे तिकीट जास्त असल्याने मधल्या वेळेत प्रवाशांनी पाठ फिरवली. त्यामुळे अपेक्षित महसूल मिळत नव्हता. या सर्व बसेस रात्रीच्या वेळी धारावी डेपोत उभ्या केल्या जातात व सकाळी सेवा सुरू करण्यासाठी त्या डेपोतून रिकाम्याच बोरिवली, ठाणे, मुलुंड व खारघर येथे जातात. संध्याकाळी शेवटची फेरी संपल्यानंतरही रिकाम्याच परत येतात. शनिवार व रविवार तसेच सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी कर्मचारी संकुलात येत नाहीत. या दिवसात सकाळी 10 ते संध्याकाळी चार अशी सेवा सुरू असते. मात्र, प्रवाशांचा प्रतिसाद नसतो. हे एकूणच तोट्याचे आणि प्रवाशांच्या अल्प प्रतिसादाचे गणित पाहून एमएमआरडीएने बस बेस्टकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या बसची मालकी, देखभाल व उत्तरदायित्व बेस्टला दिले जाणार आहे.
... तर मोठा प्रतिसाद
सध्या बेस्टच्या सर्वसाधारण एसी बसचे किमान भाडे अनुक्रमे पाच व सहा रुपये आहे. तर एमएमआरडीएच्या एसी बसचे लांब अंतरासाठीचे भाडे किमान 21 रु. तर कमाल 121 रुपये आहे. तर, संकुल ते वांद्रे कुर्ला व सायन याच भागातील फेरीचे भाडे किमान 21 रु. तर कमाल 45 रु. आहे. बेस्टच्या नव्या तिकीट धोरणानुसार हायब्रिड बसचे भाडेही किमान पाच रुपये असू शकते. त्यामुळे या बसला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद लाभेल, अशी अपेक्षा आहे. बस हायब्रिड असल्याने इंधनाच्या खर्चातही मोठी बचत होते.