Breaking News

धनंजय मुंडे यांच्यावर फसवणुकीचा आरोप

न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकर्‍यांचे सहकुटूंब धरणे

बीड | प्रतिनिधीः-
जगमित्र शुगर फॅक्टरी सुरु करायची आहे.  त्यामध्ये तुमच्या मुलाला नोकरी देतो, तुम्ही तुमची जमिन कारखान्याला द्या असो प्रलोभन दाखवून ना.धनंजय मुंडे यांनी जमीन व्यवहारात फसवणूक केल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे. यासंदर्भात धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी संबंधीत शेतकरी सहकुटूंब जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करू लागले आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत पूस (ता.अंबाजोगाई) येथील आठ ते नऊ शेतकरी सहकुटूंब जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज ठाण मांडून बसले आहेत. यासंदर्भात शेतकरी उध्दव कचरू सावंत यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवदेनात म्हटले आहे की, ना.धनंजय पंडितराव मुंडे यांनी जगमित्र शुगर फॅक्टरी सुरु करायची आहे. त्यात तुमच्या मुलाला नौकरी देतो, तुमची जमीन कारखान्याला द्या असे प्रलोभन दाखवून माझ्याकडून जमिन लिहून घेतली. त्या जमिनीचा सौदा ठरल्याप्रमाणे पैसे दिले नाहीत आणि मुलाला नोकरीही लावली नाही. माझी फसवणूक झाल्याने मी बर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेलो असता त्याठिकाणी गुन्हा नोंद करून घेण्यासनकार देण्यात आला. माझ्यासारख्या गरिबावर अन्याय होवूनही पोलिस प्रशासन दखल घेत नाही. त्यामुळे माझ्यासह इतर शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दि. १ रोजी धरणे आंदोलन करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. निवेदनावर उध्दव सावंत यांच्यासह माणिक भालेराव, वसंत पवार, संजय सावंत, शांताबाई सावंत, सुमनबाई भालेराव, लखन भालेराव, मौला कासीम शेख, नजबनबी मौला शेख आदींच्या स्वाक्षर्‍या आणि अंगठे आहेत.विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करा, त्यांच्यावर गुन्हा दाखल न करणार्‍या अधिकार्‍यांना निलंबित करण्यात यावे, आमच्या लुबाडलेल्या जमीनी परत देण्यात याव्यात, धनंजय मुंडे यांच्याकडून आमच्या जिवाला धोका आहे. त्यामुळे आम्हाला संरक्षण देण्यात यावे आणि मुख्यमंत्री यांनी स्वत: याप्रकरणात लक्ष घालून आमच्या जमीनी आम्हाला परत कराव्यात अशी मागणी शेतकर्‍यांनी केल आहे.