Breaking News

भाजप-काँग्रेस शक्तीप्रदर्शनास तयार

कर्नाटकचा तिढाः कुमारस्वामींचा विश्‍वासदर्शक ठरावासाठी, तर येदियुरप्पांचा अविश्‍वासासाठी आग्रह


बंगळूर, शिर्डी
कर्नाटकच्या राजकारणात अद्यापही खळबळ सुरूच आहे. मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी परवानगी मागितली आहे, तर भाजपचे नेते बी. एस. येदियुरप्पा यांनी मात्र अविश्‍वास ठरावाचा आग्रह धरला आहे. दोन्हींच्या म्हणण्याचा अर्थ एकच असून काँग्रेसचा सरकार वाचविण्यासाठी, तर भाजपचा सरकार पाडण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते बंडखोर आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. राजीनामा दिलेल्यांपैकी आणखी पाच आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव धाव घेतली आहे. काँग्रेसचे वरीष्ठ नेते आणि बंडखोर आमदार आनंद सिंह आणि रोशन बेग यांच्यासह पाच आमदारांनी आपले राजीनामे न स्वीकारल्याबद्दल विधानसभा अध्यक्षांविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या बंडखोर आमदारांनी आणि कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी करताना मंगळवारपर्यंत स्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश दिला होता.
येदियुरप्पा यांचे म्हणणे आहे, की पक्षाला अविश्‍वास प्रस्तावाबाबत कोणतीही अडचण नाही; मात्र त्यासाठी आम्ही सोमवारपर्यंत वाट पाहू. त्यानंतर विधानसभेत अविश्‍वास प्रस्तावाचा सामना करू. अविश्‍वास प्रस्तावावरून भाजपही काळजीत असल्याचे दिसते. भाजपने आपल्या आमदारांना हॉटेल आणि रिसॉर्टमध्ये पाठवून दिले आहे.
सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसने निकराचे प्रयत्न सुरू केले आहेत. बंडखोर आमदारांची समजूत काढण्यासाठी पडद्यामागून हालचाली सुरू आहेत. काँग्रेसचे संकटमोचक मानले जाणारे डी. के. शिवकुमार यांनी बांधकाम मंत्री एम. टी. बी नागराज यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढली. याशिवाय इतर आमदारांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहेत. दरम्यान, अन्य बंडखोरांनी शिर्डीत येऊन साईबाबांना साकडे घातले. दरम्यान, विधानसभेचे अध्यक्ष रमेश कुमार विश्‍वासदर्शक ठराव मांडण्यास कधी संधी देतात, याकडे लक्ष लागले आहे. शिवकुमार आज पहाटे पाच वाजता नागराज यांच्या घरी पोहोचले. त्यांनी जवळपास पाच तास त्यांच्याशी बातचीत केली. शिवकुमार यांनी नागराज यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. या बैठकीनंतर नागराज काँग्रेससोबतच राहणार असल्याची माहिती शिवकुमार यांनी दिली,  तर दुसरीकडे रामलिंग रेड्डी, मुणीरत्ना आणि आर. रोशन बेग यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मी राजीनामा द्यावा अशी परिस्थिती निर्माण झाली होती; मात्र आता शिवकुमार आणि इतर काँग्रेस नेत्यांनी मला राजीनामा मागे घेण्याचा आग्रह केला, असे नागराज यांनी सांगितले.
कर्नाटकमधील काँग्रेस आणि जनता दल धर्मनिरपक्ष (जेडीएस) पक्षाच्या बंडखोर आमदारांनी शिर्डीत जाऊन साईदर्शन घेतले. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास चार्टर विमानाने त्यांचे शिर्डीतील साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. विमानतळावरून हे आमदार खासगी बसने शिर्डीत दाखल झाले. या वेळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

राजीनामा मागे घेण्याचा विचार
काँग्रेसचे बंडखोर आमदार एमटीबी नागराज हे काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले होते. तत्पूर्वी, त्यांनी काँग्रेसचे संकटमोचक डी. शिवकुमार यांच्याशी चर्चा केली होती. शिवकुमार यांच्याशी चर्चेनंतर त्यांनी म्हटले होते, की त्यांना राजीनामा मागे घेण्याची आग्रही विनंती करण्यात आली आहे. त्यानंतर आता सुधाकरराव यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपण राजीनामा मागे घेण्याबाबत विचार करू असे त्यांनी म्हटले आहे.


काँग्रेसने केला निषेध
युवक काँग्रेसच्या वतीने या सर्व बंडखोर आमदारांना शिर्डीत काँग्रेस पक्षाचे झेंडे दाखविण्यात आले. या वेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी झिंदाबादच्या घोषणा देत भारतीय जनता पक्षाचा निषेध केला.