Breaking News

अंगणवाडी सेविका व मदतनीसांची नेवासे शहरात दिंडी

नेवासे/प्रतिनिधी
 आषाढी एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर नेवासे व टोका गटातील अंगणवाडी सेविका व मदतनिस यांच्यावतीने नेवासे शहर ते संत ज्ञानेश्‍वर महाराज मंदिर अशी पायी पालखी दिंडी काढण्यात आली.पोषण आहाराचा नारा देत व कुपोषण मुक्तीचा संदेश देत दिंडीने नेवासकरांचे लक्ष वेधून घेतले होते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला..हरी ओम विठ्ठलाच्या गजरात यावेळी सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी माऊलीच्या प्रांगणात रिंगण सादर केले.
  नेवासे खुर्द जिल्हा परिषद शाळा प्रांगणातून दिंडीला प्रारंभ करण्यात आला. अंगणवाडीच्या पर्यवेक्षिका श्यामला गायधने व अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा मन्नाबी शेख यांनी दिंडीचे नेतृत्व केले. ज्ञानोबा माऊली तुकाराम चा जयघोष करत नेवासे शहरातून काढलेल्या या दिंडीचे चौकाचौकात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. या दिंडीच्या अग्रभागी अंगणवाडीतील बाल वारकरी, विठ्ठल रुख्मिणीची व वारकर्‍यांची वेशभूषा करून दिंडीत सहभागी झाले होते. नगरपंचायत चौक व मोहिनीराज मंदिरासमोर ही दिंडी आल्यानंतर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी गोल रिंगण सादर केले. स्वच्छतेचे संदेश देत पावसाळ्यात होणार्‍या आजाराविषयी घ्यावयाची काळजी, पोषण आहार व कुपोषण मुक्तीचा संदेश देत या दिंडीने मोठी जनजागृती व प्रबोधन केले.
 या दिंडीमध्ये अंगणवाडी सेविका मन्नाबी शेख, मंगल भाकरे, हिरा  चक्रनारायण, कावेरी दारुंटे, आशा वाळुंजकर, नीलम डौले, कावेरी मापारी, बेबीताई पवार, योगिता केंदळे, श्रीमती बडवे, नंदा उगले, श्रीमती गडाख व आदी सहभागी झाल्या होत्या.