Breaking News

लष्कराच्या ‘के. के. रेंज’ मधील स्फोटात दोघे ठार

अहमदनगर/प्रतिनिधी
शहरातील एमआयडीसी हद्दीतील खारे कर्जुने येथील के. के. रेंज भागातील लष्कराच्या भागामध्ये लष्कराची युद्ध प्रात्यक्षिके मोठ्या प्रमाणात चालतात. सरावादरम्यान मोठ्या प्रमाणावर दारुगोळा  व स्फोट घडविले जातात. यावेळी स्फोट झाल्यानंतर काही स्फोटक वस्तूंचे पार्ट, अवशेष तेथेच मैदानावर पडून राहतात. तसेच स्फोटकातील भंगारांना एमआयडीसीमध्ये विक्री केल्यास चांगली किंमत मिळते. त्यामुळे असे पार्ट म्हणजे भंगार गोळा करण्यासाठी खारे कर्जुने गावातील नागरिका मोठ्या संख्येने जातात. वास्तविक पाहता, लष्करी अधिकार्‍यांनी अशाप्रकारे भंगार गोळा करण्यासाठी लष्करी हद्दीत नागरिकांच्या प्रवेशाला परवानगी नाकारली पाहिजे. परंतु सराव झाल्यानंतर गावातील लोक पडलेले भंगार गोळा करण्याच्या हेतूने जातात. अशाच प्रकारे खारे कर्जुने गावातील रहिवासी असलेल्या दोघांचा भंगार गोळा करताना भंगारातील वस्तूचा मोठा स्फोट होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
घटनेची थोडक्यात हकीकत अशी - एमआयडीसी हद्दीत असणार्‍या लष्कराच्या के.के.रेंज भागामध्ये रात्रीच्या सुमाराला स्फोट होऊन यामध्ये खारे कर्जुने गावातील अक्षय नवनाथ गायकवाड (वय 19) आणि संदीप भाऊसाहेब तिरवडे (वय 32, रा. खारे कर्जुने, ता. नगर) हे मृत्युमुखी पडलेले आहेत.  मंगळवारी (दि.9) रात्रीच्या सुमाराला साधारण साडे अकराच्या वेळेला हे दोन जण बहुधा या ठिकाणी असलेले भंगार गोळा करण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी असलेल्या वस्तूचा स्फोट झाला. स्फोट एवढा भयानक होता की त्याचा आवाज आजूबाजूला आल्यानंतर तत्काळ लष्करातील अधिकारी तसेच नागरिक या ठिकाणी गोळा झाले. तेव्हा हे दोन जण या ठिकाणी पडलेले दिसून आले. या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बोरसे यांनी तत्काळ या दोन जणांना जिल्हा रुग्णालयामध्ये हलवले.
पोलीस कर्मचारी खताळ व त्यांच्या पथकाने त्यांना रात्रीच्या सुमाराला जिल्हा रुग्णालयात आणले असता तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. स्फोटातील मयत हे भंगार गोळा करण्याच्या हेतूने त्या ठिकाणी गेले असावेत असा पोलिसांचा अंदाज असून त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला असल्याचे पोलिस निरीक्षक बोरसे यांनी सांगितले आहे.