Breaking News

अनिवासी भारतीयांसाठी प्रॉक्सी वोटींगचा पर्याय उपलब्ध करून देणार

लंडन
अनिवासी भारतीयांना मतदानाचा हक्क बजावता यावा याबाबत सकारात्मक असून 2024 पर्यंत भारत सरकार प्रॉक्सी वोटींगचा पर्याय उपलब्ध करून देईल अशी माहिती भाजपचे परराष्ट्र व्यवहार विभागाचे प्रमुख डॉ. विजय चौथाईवाले दिली आहे. लंडन येथे इंटरनॅशनल इन्स्टिटयूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीज द्वारा आयोजित ‘भारतातील निवडणूक निकाल आणि भविष्यातील वाटचाल’  या परिसंवादात ते बोलत होते.
अनिवासी भारतीयांना मतदानाचा हक्क प्रदान करण्यात काही तांत्रिक अडचणी असून प्रॉक्सी वोटींग हा एक उत्तम उपाय राहू शकतो. मात्र याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे असून प्रॉक्सी वोटींगसाठी लागणारी मार्गदर्शक तत्त्वे निवडणूक आयोग लवकरच निश्‍चित करेल असा विश्‍वास चौथाईवाले यांनी व्यक्त केला. जे अनिवासी भारतीय भारतात मतदानास येऊ शकत नाहीत त्यांना प्रॉक्सी वोटींग महत्वाचे साधन ठरणार असून यामुळे लोकशाही सुधृढ करण्यास मदत होईल असे चौथाईवाले म्हणाले. 2019 च्या लोकसभा निवडणूकीत अनेक अनिवासी भारतीयांनी भारतात येवून मतदानाचा हक्क बजावला होता. विजय चौथाईवाले सध्या भारतीय जनता पक्षाचे परराष्ट्र व्यवहार  विभाग प्रमुख असून यापूर्वी 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातसुद्धा महत्वाची कामगिरी बजावली होती. विशेष म्हणजे 2014 साली अमित शहा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर चौथाईवालेंची भाजपच्या विदेश विभाग प्रमुखपदी नेमणूक केली होती. 2014 ते 2019 दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अनिवासी भारतीयांशी अनेक कार्यक्रम जगभरात झाले. या सर्व कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात चौथाईवाले यांची प्रमुख भूमिका आहे. राजकारणात प्रवेश करण्याआधी विजय चौथाईवाले टोरेंट फार्मासुटिकल या बहुराष्ट्रीय संस्थेत वैज्ञानिक म्हणून कार्यरत होते.