Breaking News

कंटेनरच्या धडकेने बस पलटी; सारसनगरच्या विद्यार्थीनीचा मृत्यू

अहमदनगर/प्रतिनिधी
 पारनेरवरून नगरला निघालेल्या एसटी बसला नेप्ती रोडवरील बायपासजवळ कंटेनरने मागून येऊन जोराची धडक दिली. या अपघातात नेप्ती येथील छत्रपती इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकणार्‍या सुजीता परमेश्‍वर बडे (वय 21, रा. सारसनगर, नगर) हिचा मृत्यू झाला. बसमधील 12 ते 15 प्रवासी जखमी झाले आहे. हा अपघात झालेली एसटी ही पारनेर डेपोची आहे.
 बस नगरच्या दिशेने येत असताना कंटेनरने मागून येऊन जोराची धडक दिली. या धडकेमुळे बस ने जागेवर पलटी मारली. अचानक झालेल्या या अपघातामुळे बसमधील प्रवासी गांगरून गेले. अनेक जण बसमध्येच चितर-पीतर होऊन पडले. यात प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. काही प्रवाशांचे हात-पाय जायबंदी आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे. अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी स्थानिक रहिवाशांनी मदत केली. जिल्हा रुग्णालयात गर्दी झाली होती. सुजीता बडेही सारसनगर मधील रहिवाशी आहे. तिचा या अपघातात मृत्यू झाला. तिच्या डोक्याला मार लागला. तिच्या आईला ही घटना समजल्यावर त्यांनी जिल्हा रुग्णालयात येऊन भावनांचा बांध मोकळा केला. बसमधील प्रवासी हे नगर आणि पारनेर तालुक्यातील आहेत.