Breaking News

दोन तिहेरी हत्यांकाडाने राज्य हादरले

शिर्डीत एकाच कुटुंबातील तिघांची, तर मुंबईत तीन कामगारांची हत्या


मुंबई, नगर / प्रतिनिधी

शिर्डी येथे आज एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आली, तर नवी मुंबईत तीन कामगारांची हत्या करण्यात आली. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.
शिर्डीनजीकच्या निमगाव येथे विजय नगरात राहणार्‍या ठाकूर कुटुंबीयांची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. अर्जुन पन्हाळे याने कोयत्याने ठाकूर दाम्पत्याचे गळे कापले. तसेच शाळेत जाण्याच्या तयारीत असलेल्या त्यांच्या 16 वर्षांच्या मुलीचीदेखील हत्या केली. पन्हाळे यांच्या हल्ल्यात राजेंद्र ठाकूर (35) आणि तावू ठाकूर (18) जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी साईबाबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. निमगाव येथील तिघांची हत्या करण्यात आलेल्यांत नामदेव ठाकूर (62), दगूबाई ठाकूर (50), खुशी ठाकूर (16) या तिघांचा समावेश आहे.
ठाकूर यांच्या शेजारी राहणार्‍या अर्जुन पन्हाळे यांनी किरकोळ वादातून हे हत्याकांड झाले असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासातून पुढे आली आहे. या कुटुंबातील एक सहा वर्षांची मुलगी वाचली आहे. या घटनेमुळे थरकाप उडाला आहे. हत्येनंतर खूनी शेजारीच असलेल्या त्याच्या खोलीत जाऊन बसला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नवी मुंबई परिसरातील तुर्भे एमआयडीसीत असलेल्या भंगाराच्या गोदामात झोपेत असलेल्या तीन कामगारांची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. बोनसरी गावात ही घटना घडली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली. आर्थिक व्यवहारातून हे तिहेरी हत्याकांड झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तुर्भे एमआयडीसीतील बोनसरी गावाजवळ अनधिकृतपणे चालत असलेल्या भंगाराच्या गोदामात हा प्रकार घडला. मृतांमध्ये इरशाद (20 ), नौशाद (14) आणि राजेश (28) यांचा समावेश आहे. या तिहेरी खुनामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. हल्लेखोरांनी तिन्ही कामगारांच्या डोक्यात जड वस्तूने हल्ला केला. त्यानंतर त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. या हत्येनंतर त्यांचे मृतदेह त्याच ठिकाणी लपवण्यात आले होते. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, तपास सुरू केला. घटनास्थळी पोलिसांचे श्‍वान पथक आणि फिंगर प्रिंट शोधणारी टीम दाखल झाली. मारेकर्‍यांना शोधण्यासाठी पोलिसांची विविध पथके शहरातील विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत.


शिर्डीप्रकरणातील आरोपी अटकेत
 दरम्यान या हल्यात एक सहा वर्षांची मुलगी वाचली आहे. हत्येनंतर आरोपी शेजारीच असलेल्या त्याच्या खोलीत जाऊन बसला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या घटनेमुळे शिर्डी हादरून गेली आहे.