Breaking News

शेतकर्‍यांना कर्जमाफी का नाही?

राहुल गांधी यांचा सवाल; श्रीमंताचे कर्ज मात्र माफ

नवीदिल्ली
भाजप लाखो कोटी रुपयांचे श्रीमंतांचे कर्ज माफ करू शकते. मग, शेतकर्‍यांचे कर्ज का माफ करू शकत नाही, असा सवाल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी संसदेत विचारला आहे. शेतकरी आत्महत्यांचा प्रश्‍न उपस्थित करत भाजपच्या कृषीविषयक धोरणावरही त्यांनी सडकून टीका केली.

वायनाडमध्ये कर्ज न फेडू शकलेल्या आठ हजार शेतकर्‍यांना बँकांनी नोटीस बजावली असून त्यांची संपत्ती जप्त केली जात आहे. कर्जाच्या बोज्याखाली दबून मंगळवारी वायनाडमध्ये एका शेतकर्‍याने आत्महत्या केली. त्यामुळेच आज शून्य प्रहरादरम्यान राहुल यांनी शेतकरी आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केला. सरकारने गेल्या पाच वर्षांत श्रीमंतांचे साडेपाच लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे; पण त्याचवेळी शेतकर्‍यांचे कर्ज मात्र सरकार माफ करत नाही. शेतकर्‍यांना दिलेल्या आश्‍वासनांची सरकारने पूर्तता करायला हवी, असे राहुल यांनी सांगितले. याआधीही राहुल यांनी  भाजप सरकार शेतकरीविरोधी असल्याचा आरोप केला होता.

राहुल गांधी यांच्या आरोपांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शेतकर्‍यांच्या दुर्दशेला आधीच्या काँग्रेस सरकारांचीच धोरणे जबाबदार असल्याचा आरोप सिंह यांनी केला आहे. शेतकर्‍यांच्या दुर्दशेला भाजपची पाच वर्षे नाही, तर काँग्रेसची सत्तर वर्षांची धोरणे जबाबदार आहेत. काँग्रेसच्या कार्यकाळात जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. उलट भाजपने तर शेतकर्‍यांना सर्वाधिक हमीभाव दिला आहे. शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न भाजप करते आहे, असा दावा राजनाथ सिंह यांनी केला आहे. या वेळी काँग्रेसच्या खासदारांनी सभागृहात गोंधळ घातला.