Breaking News

काश्मीरमध्ये चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा

श्रीनगर
जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये रविवारी (30 जून) चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे.
सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये बडगाम जिल्ह्यात चकमक सुरू झाली. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत चार स्थानिक अतिरेकी ठार झाले होते. दारमदोरा भागात काही अतिरेकी लपलेल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी त्या भागाची घेराबंदी केली व शोधसत्र हाती घेतले. याच वेळी त्या ठिकाणी लपलेल्या अतिरेक्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. सुरक्षा दलानेही त्याला चोख प्रत्युत्तर दिल्याने चकमक उडाली. यात चार अतिरेकी ठार झाले. लष्कर व पोलिसांनी सांगितले की, ठार करण्यात आलेल्या अतिरेक्यांची ओळख पटली आहे.