Breaking News

विद्यार्थ्यांना पास वाटप शाळेतच करण्याची मनसेची मागणी

  पारनेर/प्रतिनिधी
 विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या सवलतीच्या पासांचे त्या-त्या शाळांमध्येच वितरण करण्यात यावे, अन्यथा आगार प्रमुखांना काळे फासून मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा पक्षाचे शहरशध्यक्ष वसीम राजे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी दिला.
 सवलतीच्या पासांमधील गैरवापर टाळण्यासाठी महामंडळाने सवलतधारकांना स्मार्ट पासेस देण्याचा निर्णय घेतला आहे. जेष्ठ नागरिकांनाही असेच पासेस देण्यात येत असून त्यासाठी खासगी यंत्रणेची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना मात्र, पारनेर आगरातच पास घेण्यासाठी यावे लागत असून तालुकाभरातील विद्यार्थ्यांची त्यामुळे चांगलीच हेळसांड होत आहे. पाससाठी दोन दोन दिवस बसस्थानकावर उपाशीपोटी ताटकाळणार्‍या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होत आहे. ते टाळण्यासाठी स्मार्ट पासेसचे त्या त्या शाळेतच वितरण करण्यात आले, तर विद्यार्थ्यांची ससेहोलपट थांबून त्यांचे शैक्षणिक नुकसानही होणार नसल्याचे आगार प्रमुखांना देण्यात आलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
  स्मार्ट पास वितरणाची प्रक्रिया किचकट असून त्यात वेळेचा मोठा अपव्यय होतो. परिणामी पास हाती पडेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवासाचे संपूर्ण भाडे भरून प्रवास करावा लागत आहे. ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील असून दुष्काळामूळे पिचलेल्या शेतकर्‍यांना हा खर्च पेलवणारा नाही. याची दखल घेऊन महामंडळाने ग्रामीण विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. आगार प्रमुखांना भेटलेल्या शिष्टमंडळात शहराध्यक्ष वसीम राजे, सुनील शेळके, अमन राजे, अक्षय सूर्यवंशी, इम्रान राजे, भूषण शेलार यांचा समावेश होता.