Breaking News

वेळीच उपाययोजना केल्यास लष्करी अळीचे नियंत्रण शक्य : सुपेकर

कर्जत/प्रतिनिधी
मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळी ही अत्यंत विध्वंसक कीड असून या किडीने पिकांचा मोठा विध्वंस होत आहे. या अळीमुळे मका पिकाचे सर्वाधिक नुकसान होत आहे. या किडीचा मादी पतंग एका रात्रीत 100 किमी तर पंधरा दिवसात दोन हजार किमी प्रवास करते. यामुळे दुर्गम भागातील मका पिक शोधून तेथे सुद्धा अंडी घातली जात असल्याने अशा ठिकाणीही प्रादुर्भाव आढळून येत आहे. वेळीच उपाययोजना केल्यास लष्करी अळीचे नियंत्रण करणे शक्य असल्याचे मत तालुका कृषी अधिकारी दिपक सुपेकर यांनी व्यक्त केले. कर्जत तालुक्यातील कुळधरण येथे लष्करी अळी नियंत्रण शिवार फेरी दरम्यान आयोजित शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते.
 कुळधरण भागात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. यामध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर तालुका कृषी अधिकारी दिपक सुपेकर, मंडल कृषी अधिकारी विकास मोढळे, कृषी सहाय्यक भाऊसाहेब वाघमारे तसेच कृषी विभागाच्या कर्मचार्‍यांनी शिवार फेरीचे आयोजन केले. त्यानंतर जगदंबा मंगल कार्यालयात दिपक सुपेकर यांनी चित्रफिती दाखवत शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना सुपेकर म्हणाले की, तालुक्यामध्ये मका पिकावर या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ही कीड पिकांचे पाने खाऊन नुकसान करते. प्रथम अवस्थेतील अळी कोवळ्या पानावर उपजीविका करते. एका बाजूने खरवडून खाल्ल्यामुळे पानांवर पांढरे ठिपके दिसून येतात. दुसर्‍या व तिसर्‍या अवस्थेतील अळ्या पानावर छिद्रे पाडून पानाच्या कडेपासून शिरेकडे  पाने खायला सुरवात करतात. पोंग्यामध्ये असताना जर किडीचा प्रादुर्भाव झाल्यास पान उघडल्यानंतर पानावर एका रांगेत गोल छिद्रे दिसून येतात. ही कीड स्वजातीय भक्षक असल्यामुळे एका मक्याच्या झाडावर एक किंवा जास्तीत जास्त दोन अळ्या आढळून येतात. पूर्ण वाढ झालेल्या अळ्या अधाशीपणे झाडाची पाने खाऊन पानांच्या फक्त शिराच शिल्लक ठेवतात. मका पिकात सुरवातीच्या काळात पोंग्यामध्ये प्रादुर्भाव कमी दिसतो, परंतु नंतरच्या अवस्थेत पूर्ण पोग्याचे नुकसान होते. मक्याच्या एका झाडावर एक अळी असेल तर उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट येऊ शकते.
या किडीचे पतंग हे ताकदवान असून या किडीची प्रजनन क्षमता खूप जास्त आहे. त्यामुळेेे अळीचे योग्य वेळीच नियंत्रण करणे गरजेचे असल्याचे सुपेकर म्हणाले.

 प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय
शेत तणमुक्त व स्वच्छ ठेवावे. मका पिकामध्ये गुळाच्या पाण्याची फवारणी करावी. एकरी दहा पक्षी थांबे तयार करावेत. किडीच्या नियंत्रणासाठी एकरी पाच कामगंध सापळे लावावेत. चुना आणि बारीक वाळू अथवा रेती 1.9 प्रमाणात पोग्यात टाकावे. पाच टक्के  निंबोळी अर्काची फवारणी करावी. आवश्यकतेनुसार रासायनिक कीटकनाशकांच्या फवारण्या कराव्यात.