Breaking News

शेतकरी बांधवांनी मान्यता नसलेल्या बियाण्याची लागवड करू नये : अनिल इंगळे

अमरावती
शेतकरी बांधवांनी शासन मान्यता नसलेल्या बोगस व बेकायदेशीर एचटीबीटी बियाण्याची लागवड करु नये, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे यांनी केले आहे. बेकायदेशीर बियाण्याची लागवड केल्याने शेताचे, तसेच पर्यावरणाचे नुकसान होण्याची शक्यता असते. पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार अशा बियाण्याचा वापर व साठवणूक हा गुन्हा ठरविण्यात आला आहे. त्यासाठी पाच वर्षे कारावास व 1 वर्ष दंडाची तरतूद आहे, असे इंगळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
जिल्ह्यात जर कोणतीही व्यक्ती बोगस व बेकायदेशीर बियाणे विक्री करताना आढळून आल्यास तत्काळ कळवावे. बेकायदेशीर बियाणे विक्री करणार्‍या व्यक्तीवर बियाणे नियंत्रण आदेश (1983), महाराष्ट्र कापूस बियाणे अधिनियम (2009 व 2010), पर्यावरण संरक्षण कायदा (1986)अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे इंगळे यांनी स्पष्ट केले आहे. मान्यता नसलेले बोगस व बेकायदेशीर (एचटीबीटी) बियाणे (आरआर किंवा राऊंडअप बीटी किंवा तणावरची बीटी किंवा बिडगार्ड) आदी नावाने विक्री केली जाण्याची शक्यता आहे. असे बियाणे अधिकृत नाही. त्याला शासनाची मान्यता नाही. असे बियाणे जादा दराने विक्री करून पावती दिली जात नाही. मान्यता नसलेल्या बोगस व बेकायदेशीर बियाण्याच्या पाकिटावर कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान, वाण, कोणत्या क्षेत्रासाठी शिफारस केली आहे, याचा उल्लेख नसतो व गुणवत्तेचे विवरण नसते. कृषी केंद्रात कपाशी बियाण्याची उपलब्धता मुबलक प्रमाणात असून, सर्व कपाशी बियाण्यामध्ये बीजी-1 व बीजी-2 हे जनुकीय अभियांत्रिकी समितीची मान्यता असलेले तंत्रज्ञान आहे. ते वापरून कंपन्या वाण विकसित करतात. पीकाचे उत्पादन चांगले येण्यासाठी मशागत, लागवडीचे अंतर, आंतरमशागत, जमिनीचा पोत, खते, मूलद्रव्ये, सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचा संतुलित वापर, कीड व रोग व्यवस्थापन, पाऊस अशा अनेक बाबी आवश्यक असतात. त्यामुळे एका विशिष्ट वाणाची मागणी न करता इतरही कपाशी वाणांची लागवड करावी, असे त्यांनी नमूद केले आहे. बियाण्याची खरेदी अधिकृत बियाणे परवानाधारक यांच्याकडूनच करावी. बियाणे खरेदी करताना न चुकता पक्के बिल घ्यावे. बिलात पीक, वाण लॉट क्र., वजन, अंतिम मुदत, कंपनीचे पूर्ण नाव नमूद असले पाहिजे. कृषी केंद्रधारकाने पक्के बिल न दिल्यास तत्काळ कृषी कार्यालयात संपर्क करावा. बियाणे पाकिटावरील सरकारमान्य चिन्ह तपासून घ्यावे. बोलगार्ड 2 मध्ये उपलब्ध असलेल्या बिजी-2 या वाणाची एमआरपी किंमत 730 रु. आहे. पाकिट सीलबंद असल्याची खात्री करावी. बिजी- 2 तंत्रज्ञान सर्व वाणामध्ये सारखेच असते. त्यामुळे एका विशिष्ट वाणाची मागणी टाळावी, असे आवाहन  इंगळे यांनी केले आहे.