Breaking News

स्व.अशोकराव मोरे यांचे कार्य आजही स्मरणात-आ.थोरात

संगमनेर/प्रतिनिधी
स्व.अशोकराव मोरे माझ्या राजकिय जिवनातील अतिशय विश्‍वासू सहकारी होते. माझ्या राजकिय वाटचालीत त्यांचे महत्वाचे योगदान आहे. काँग्रेस पक्षाचा विचार त्यांनी जनसामान्यांपर्यंत पोहचवला. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून त्यांनी केलेले विकास कामे बघितल्यावर अशोकरावांची स्मृती डोळ्यासमोर येते. त्यांनी केलेले काम कायम जनतेच्या स्मरणात असल्याचे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी केले.
  पिंपळगाव कोंझिरा येथे स्व.अशोकराव मोरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित सर्वरोग निदान शिबीर, मोफत नेत्ररोग तपासणी, दंतरोग तपासणी व उपचार तसेच रक्तदान शिबीर कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी आ.डॉ.सुधिर तांबे, जि.प.सदस्य रामहरी कातोरे, अमित पंडित, पांडुरंग घुले, साहेबराव गडाख, बाळासाहेब मोरे, मधुकरराव गुंजाळ, सुरेखा मोरे, बाळासाहेब खर्डे, सरपंच बादशहा वाळूंज, श्रीराम पवार, बापूसाहेब कर्पे, भाऊसाहेब वाळूंज, विकास आहेर, महेश कर्पे, बाळासाहेब झोडगे, संजय कर्पे  आदी मान्यवर उपस्थित होते.
  यावेळी आ. थोरात म्हणाले की, स्व.अशोकराव मोरे 1985 पासून माझाबरोबर राजकारणात सक्रिय होते. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी प्रथम राजकारणाचा यशस्वी श्रीगणेशा केला. संगमनेर तालुका व संपूर्ण जिल्ह्यात त्यांचा आजही आदराने उल्लेख होतो. त्यांच्या नसण्याने तालुका एका सक्षम व सच्च्या कार्यकर्त्याला मुकला असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
आ.डॉ.सुधिर तांबे म्हणाले की, स्व.अशोकराव मोरे यांनी ग्रामिण भागाशी असणारी नाळ कधीही तुटू दिली नाही. पिंपळगाव कोंझिरा येथील वनराई पाहिल्यास अशोकराव पर्यावरणाच्या बाबतीत किती सजग होते हे दिसते. याप्रसंगी रामहरी कातोरे, अमित पंडित, बाळसाहेब मोरे व पांडुरंग घुले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्व.अशोकराव मोरे यांच्या स्मृतीस्थळावर सर्व मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण केली. याप्रसंगी आयोजित केलेल्या सर्वरोग निदान व उपचार शिबीराचा परिसरातील 500 नागरिकांनी लाभ घेतला.
या कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपसरपंच सुभाष कर्पे, संतोष कर्पे, बादशहा आहेर, जालिंदर मोरे, राजेंद्र कर्पे, दत्तात्रय खिलारी, संभाजी वाळूंज, संगम आहेर, मच्छिंद्र आहेर, राधाकिसन कर्पे, सागर आहेर, बाबासाहेब आहेर, महेश वाळूंज, सुदर्शन खर्डे, विक्रम मोरे आदींनी विशेष प्रयत्न केले.