Breaking News

शेतकरी कधी होणार मोठा?

नाशिक/प्रतिनिधी
पावसाचा खरा भक्त कोण? तर शेतकरी! शेतकरी हा सर्वांसाठी देवच आहे, असे मानले पाहिजे. तो धान्य पिकवतो, भाजीपाला, फळे पिकवतो. त्याबदल्यात आपण त्याला पैसे देतो. थोडक्यात, भाजी विक्रेते शेतकर्यांकडून भाज्या विकत घेतात. फळ विक्रेते शेतकर्यांकडून फळे विकत घेतात आणि ते आपल्याला विकतात. या विक्रेत्यांच्या मोठमोठाल्या बाजारपेठा आहेत. आजकाल फळांचे, भाज्यांचे दर वाढत आहेत. तरीही आपण ते विकत घेतोय; कारण भूक असते. अन्नाची आपल्याला गरज आहे. अन्नाशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही. आपण जर यंत्र असतो, तर आपण इंधनावरच जगलो असतो. अशा महागाईमुळे माणसाचं यंत्र व्हावं! अन्नाशिवाय जिवंत तर राहू. महागाईही थांबेल आणि कोणी उपाशीपोटी झोपणार नाही.
शेतकर्यांचा या सर्व बाबींमध्ये काही दोष आहे, असे म्हणता येणार नाही; पण विक्रेता मोठा होत आहे. तरीही काही वाक्ये आपल्याला ऐकू येतात की, ‘गरिबांकडून वस्तू विकत घ्या.’ सध्या गरीब कोण? छोटा असो वा मोठा, काही व्यापारी प्रामाणिक म्हणून त्यांना गरीब म्हणता येत नाही. तो पुरेसा लायक असतो आपला उदरनिर्वाह चालविण्यापुरता. गरीब हा कधीच व्यावसायिक नसतो, तो कधीच काही विकताना दिसत नाही. तो कर्म करत असतो. तर पोट भरण्यासाठी घरातील जो वस्तू नेऊन विकतो तो गरीब आणि लाचार! त्यांना त्यांच्या अडथळ्यांमध्ये साथ द्या, परिस्थितीवर मात करण्यासाठी धीर द्या. मदत करा. त्यावर ते त्यांचं जग पेलू शकतील.रस्त्यावर फिरणारे भिकारी अजून भिकारी आहेत. त्यांच्या अडचणी कधी समजून घेत नाहीत, कोणी कामधंदा देत नाहीत, विश्‍वासात घेत नाहीत. छोट्या-मोठ्या भाजी विक्रेत्यांचं, फळ विक्रेत्यांचं तेच आहे. ते छोटे आहेत ही भावना प्रथम आपल्या ठिकाणी म्हणजे समाजात रुजते आणि त्यांनाही स्वत:ला कमी लेखायला आपणच शिकवतो. तो आज छोटा व्यावसायिक विक्रेता असला, तरी उद्याचा मोठा व्यावसायिक, विक्रेता होऊ शकतो. बरं कमी मालाचा त्याला जास्त मोबदला देत गेलो, तर तेही अयोग्य आहे. जास्त पैसे कमावण्यासाठी तो कोणतीही भविष्याची योजना राबवू शकणार नाही.
सहानुभूतीने जादा पैसा मिळू लागले, तर आहे तोच व्यवसाय जास्त पैसे मिळतात म्हणून कल्पकता न लढवता करत राहील. त्याच्या पुढच्या योजना तो यशस्वीरीत्या आखू शकणार नाही.त्याचा व्यवसाय आपल्यासारखे जास्त मोबदला देणारे उद्ध्वस्त करतील. त्यामुळे व्यावसायिकांवर आणि विक्रेत्यांवर दयेचा पूल बांधायला नको. त्याला योजना राबवू द्या, येणार्या अडचणींवर मात करण्यासाठी त्याला स्वत:चं डोकं खपवू द्या. छोटा-मोठा व्यवसाय करू शकेल अशा योजना प्रत्येकाने स्वत:साठी आणि दुसर्यासाठी अंमलात आणल्या पाहिजेत. या विक्रेत्यांना ठरलेलाच भाव द्या. दरवाढीसाठी जेवढा विक्रेता आणि व्यावसायिक जबाबदार आहे, तेवढा शेतकरी किंवा उत्पादक जबाबदार नाही. भाजी मार्केटमध्ये भाज्यांचं नुकसान तुम्ही थांबवू शकता का?  तर नाही. किती तरी नुकसान रोज होत असते. कारण, या विक्रेत्यांना रोजच नफा मिळाला की मालाची, (भाजीपाल्याची) नासाडी गरज संपल्यासारखी होत असताना दिसते. ही नासाडी होताना गरिबांचा किंवा गरजूंचा विचार केला जातो का यात? खिशाला न परवडल्याने किती तरी लोक आज भाज्या खरेदी न करताच परतले, याची खंत या विक्रेत्यांना असते का? सहजिकच, मग यांच्यावर नको तिथे दया का दाखवायची? प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. ती एक बाजू कोणालाच पाहायची नसते का?
एक बाजूचाच आधार घेऊन समाजात समतोल साधता येत नाही. काही कायदे निघाले नसतील; पण बरेचसे कायदे सामाजिक भान असणार्यांमुळे अस्तित्वात आले. गरीब विक्रेत्यांकडून जास्तीत जास्त काही तरी विकत घ्या. यात समाजिक भान कुठे दिसते? तो गरीब नाही. छोटा विक्रेता आहे. उद्या तो होईल मोठा यावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या दयेने तो कधीच मोठा होणारा नाही. उलट, जादा पैसे दिल्याने अपंग होईल.
आज फुटपाथवर त्याचं दुकान असेल, उद्याही तिथेच असेल. तसेच मंडईमध्ये भाजी विकणार्यांचं आहे. त्यानं स्वत: भाजी पिकवलीय का? काही शेतकरी स्वत:ची भाजी घेऊन मंडई गाठत असतील; त्यांना शोधा. त्यांना प्रधान्य द्या; पण हे विक्रेते गरीब आहेत म्हणून त्यांच्यावर दया का? दया जरूर दाखवा; पण खिशातले जास्तीचे पैसे टाकून नाही. तर त्यांच्याशी जास्तीच्या गप्पा करा. त्यांच्या खर्या अडचणी कळतील, त्यांची विचारपूस करा. शेतकरी खपतो आहे शेतामध्ये, मळ्यांमध्ये, बागेमध्ये त्याला दयेची पाखर घालणारा निसर्ग आहे. जेव्हा पाऊस येईल तेव्हा त्याची शेते, मळे तो पिकवणार. बाजारात मात्र त्याच्या कष्टाचे मोल आपणच ठरवतो. दहा रुपयांची भाजी आठ रुपयांना मागतो. एक-दोन रुपयांसाठी घासाघीस करतो; पण ब्रँडेड पाव खरेदी करताना आहे ती किंमत देऊन मोकळे होतो. जर घरी गेल्यावर पॅकिंगमधून बाहेर काढल्यावर खराब लागला तर फेकून देतो. नि मुकाट्याने बसतो.  फळे, भाजीपाला विकणारा वर्षानुवर्षे तोच आहे. बाजारपेठा मोठ्या होत चालल्याने भाज्यांचे, फळांचे भाव वाढत आहेत; पण जो पिकवतो पण विकू नाही शकत, तो हतबल तसाच दिसतो आहे. यासाठी त्याने बाजारपेठेचा अभ्यास करायला हवा. त्याला दर ठरवण्याचा अधिकार द्यायला हवा. आपण त्याला तो मान द्यायला हवा; पण त्याच्या मालाऐवजी त्याची किंमत करायला नको. बस्स!