Breaking News

आषाढी एकादशी पालखी सोहळयासाठी लाखो वारकरी पंढरीत दाखल

सोलापूर 
आषाढी एकादशी आज पालखी सोहळयासाठी लाखो वारकरी पंढरीत दाखल होतील. या पार्श्‍वभूमीवर पंढरपूर सज्ज झाले आहे. लाखो भाविक येथे दाखल होऊ लागल्याने पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे. पंढरपूरमध्ये विठ्ठलाचे दर्शन घेतल्यावर किंवा घेण्यापूर्वीच याच विठ्ठलाचा पूर्व अवतार म्हणून ओळखल्या जाणा-या भगवान कृष्णाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दोन ठिकाणांवर वारकरी मेळे दाखल होत आहेत.
यंदा प्रथमच चंद्रभागेतिरी महिलांसाठी खास कपडे बदलण्याचे कक्ष खोलण्यात आले आहेत. दर्शनासाठी भव्य पत्रा शेड आहे. राज्यभरातून बंदोबस्तासाठी पोलीस दाखल झाले आहेत. तुळशीमाळ, टाळ, आकर्षक विठ्ठल मूर्ती, प्रसाद आदी साहित्याने पंढरपूरचा बाजार फुलला आहे. पंढरपूरबरोबरच गोपाळपूर आणि विष्णूपद या दोन ठिकाणी ही गर्दी होत आहे. अर्धा कृष्ण आणि अर्धा विठ्ठल हे रूप, नामदेवांचा काळ, जनाईचा संसार आणि तिचे जाते व घुसळण आदी ठिकाणे गर्दीने फुलताहेत. गोपाळकाला करून कृष्णाने जेथे बासरी ठेवली आणि जेथे आजही कृष्णकालिन पाऊलखुणा आहेत अशा विष्णुपदावर तर अनेक वारकरी दाखल होतात. चंद्रभागेच्या पात्रात नौकाविहार करून नारद पाण्यात बुडालेल्या मंदिराचेही दर्शन घेतात. गोपाळपूर येथे कृष्णाने गोपाळकाला केला होता. संत नामदेवांनी बहिणीप्रमाणे सांभाळलेली त्यांची दासी जनाबाई यांच्या भेटीस विठ्ठल स्वतः आले होते. या कथांना आधार देणारे पुरावे येथे सापडतात. यामुळे वारकऱयांच्या दृष्टीने हे मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिराप्रमाणेच महत्वाचे ठरते. विष्णूतीर्थावर दरवषी मार्गशीर्ष महिन्यात विठ्ठलाचे वास्तव्य असते. यामुळे याठिकाणी जाऊन कृष्णाने विठ्ठल अवतार घेण्यापूर्वी घालवलेला काळ आणि त्याच्या खुणा पाहण्यात वारकरी रंगून जात आहेत. आता आषाढी एकादशीपर्यंत आणि त्यानंतरही आठवडाभर वारक-यांची गर्दी कायम राहणार आहे.