Breaking News

आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांचा मराठा समाजाकडून सत्कार

पंढरपूर
जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण देणार नाही तो पर्यंत मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीची शासकीय महापूजा करू देणार नाही, अशी भूमिका मराठा समाजाच्या वतीनं मागल्या वर्षी घेतली होती. आता त्याच मराठा समाजाच्या वतीनं यंदाच्या आषाढी एकादशी निमित्त येणार्‍या मुख्यमंत्र्यांचा जंगी सत्कार करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधी याचिकेवर सुनावणी करताना आरक्षणाला वैध ठरवले होते. यासाठी राज्य सरकारने ठोस कायदेशीर पूर्तता आणि पाठपुरावा केला. त्यामुळे न्यायालयीन कसोटीवर आरक्षण टिकले. याबद्दल मराठा समाजातून समाधान व्यक्त होत आहे. या पार्श्‍वभूमीवर पंढरपुरात सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्याची घोषणा केली. यावेळी मोहन अनपट म्हणाले की, जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तो पर्यंत मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीची शासकीय महापूजा करू देणार नाही, अशी भूमिका मराठा समाजाने घेतली होती. त्यानंतर राज्यभर आरक्षण आंदोलन पेटले होते. मुख्यमंत्री त्या यात्रेसाठी आले नव्हते. समाजाची भूमिका आपल्या न्याय मागण्यासाठी होती. आणि राज्याचे प्रमुख, मागणी मान्य करण्याचे अधिकार असलेली व्यक्ती म्हणून गेल्या वर्षी समाजाने मुख्यमंत्र्यांना विरोध केला होता. आता आमची मागणी मान्य झाली आहे. त्यामुळे त्यांचे अभिनंदन करणे, मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले म्हणून त्यांचे समतेच्या भूमीत स्वागत करणे आमचे कर्तव्य आहे. म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मराठा समाजाच्या वतीने स्वागत आणि सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी आंदोलनास सहकार्य केलेल्या स्थानिक प्रमुख नेते मंडळींनाही निमंत्रित करण्यात येणार असल्याचे सांगून अनपट म्हणाले की, आंदोलनावेळी दाखल झालेले राज्यभरातील 13 हजारावरील युवकावरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ प्रकरणातील अडचणी दूर करण्यासाठी पावले उचलावीत अशीही मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार आहे. त्याचबरोबर धनगर, मुस्लिम, महादेव कोळी समाजाचे प्रश्‍न सोडवण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करणार असून गरज पडल्यास मराठा समाज या समाजाच्या आंदोलनात सोबत उतरेल, असे आश्‍वासन देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.