Breaking News

काँग्रेस अध्यक्षपदी सुशीलकुमार शिंदे?

अधिकृत घोषणा लवकरच; स्वातंत्र्योत्तर काळात मराठी नेत्याला पहिलाच मान

नवीदिल्ली
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर नव्या काँग्रेस अध्यक्षपदाबाबत सुरू झालेली चर्चा आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. कारण गांधी घराण्याकडून अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे, अशी माहिती आहे; पण अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. शिंदे यांची निवड झाल्यास काँग्रेसच्या अध्यक्षपदी स्वातंत्र्योत्तर काळात विराजमान होणारा पहिला मराठी माणूस ते असतील.

राहुल गांधी यांनी लोकसभेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या महिन्याभरात काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी अनेक व्यक्तींची नावे चर्चेत आली; परंतु निस्वार्थीपणा, नेत्यांशी एकनिष्ठता आदी गुणांचा विचार करून सुशीलकुमार शिंदे यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. यापूर्वी अशोक गेहलोत यांचे नाव चर्चेत आले होते; परंतु त्याच गेहलोत यांच्याविरोधात राजस्थानातील एक गट सक्रीय आहे. शिवाय गेहलोत यांच्यावर खुद्द राहुल यांनीच टीका केली होती. यापूर्वी सुशीलकुमारांना पक्षाने मुख्यमंत्रिपद, राज्यपाल, पक्षाचे राज्यसभेतील नेतेपद आदी पदे दिली. हिमाचल प्रदेशची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांनी दिलेल्या प्रत्येक पदाचा सन्मान वाढविताना पक्षाशी कधीही प्रतारणा केलेली नाही.
राहुल यांनी राजीनामा दिल्याने नवा अध्यक्ष कोण होणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. गांधी कुटुंबाहेरची व्यक्ती अध्यक्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिंदे यांच्या रुपाने पक्षाला दलित अध्यक्ष मिळणार आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेसला महाराष्ट्रात सत्ता मिळवून दिली; परंतु त्यानंतर त्यांना अपयशाचे धनी व्हावे लागले. लोकसभेच्या गेल्या दोन निवडणुकांत त्यांचा पराभव झाला. सुशीलकुमारांचा काळ वेगळा होता. युवकांना पक्षाकडे आकर्षित करण्याबरोबरच गटा-तटांत दुभंगलेल्या काँग्रेसजणांना एकत्र आणण्यात आणि पक्षात नवचैतन्य करण्यात त्यांना कितपय यश येते, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव आधी आघाडीवर होते; पण अखेर सुशीलकुमार शिंदे यांनी बाजी मारली असल्याची माहिती आहे.