Breaking News

शहापुर तालुक्यात रोजगार घटला

शहापूर
ठाणे जिल्ह्यातील एकमेव आदिवासी तालुका समजल्या जाणार्‍या शहापूर तालुक्यात अनेक समस्या भेडसावत आहेत. त्यातील एक समस्या म्हणजे बेरोजगारी. 14 जिल्हा परिषद गट असणार्‍या या शहापूर तालुक्यात कुणबी, आगरी, मराठा, बौद्ध, मुस्लिम व आदिवासी कातकरी समाज मोठ्या प्रमाणात आहे. या समाजाचे अनेक तरुण बेरोजगार आहेत. पूर्वी पेक्षा अधिक शिक्षण संस्था तालुक्यात आल्या आहेत. आदिवासी समाजासाठी अनेक आश्रम शाळा कार्यरत आहेत. तालुक्यात अनेक तरुण शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात आहेत. बीएड व डीएड शिक्षण घेऊन अनेक तरुण बेरोजगार आहेत. तालुक्यातील भातसा, तानसा, वैतरणा व इतर छोट्या धरणातील भूसंपादन शेतकरी व प्रकल्पग्रस्त अजूनही नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातच अनुसूचित क्षेत्रात मोडत असलेल्या शहापूर तालुक्यात जनजाती सल्लागार समितीने सुचवलेल्या राज्यपाल यांच्या अध्यादेश मुळे तालुक्यातील बिगर आदिवासी तरुण नोकरी पासून वंचित राहिल्याने बेरोजगार झाले आहेत. तालुक्यात असणार्‍या आडगाव व आसनगाव येथील एमआयडीसी क्षेत्रातील कंपन्या स्थलांतर झाल्याने व बंद पडल्याने अनेक तरुणांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. त्यातच आलेल्या अनेक संघटनाची ध्येय धोरणे कंपन्या बंद पडण्यास कारणीभूत ठरताना दिसत आहेत. खाजगी क्षेत्रांत बिल्डिंग व्यवसाय, बंगलो व्यवसाय हे तालुक्यात डबघाईस आल्याने खाजगी नोकर्‍या ही मिळणे जिकिरीचे झाले आहे. तालुक्यातील तरुणांच्या हाताला काम राहिले नसून बेरोजगारी वाढत आहे. शासकीय यंत्रणा तितकीच जबाबदार असल्याने तालुक्यातील बेरोजगारांचे म्हणणे आहे. तालुक्यात स्वयंसेवी संस्था व खाजगी कंपनी  रोजगार मेळावा घेताना दिसत आहेत. कसारा, खर्डी, आडगाव, आसनगाव, वाशिंद या ठिकाणी रेल्वे सुविधा तालुक्यात असल्याने अनेक युवा वर्ग मुबई, ठाणे येथे रोजगारासाठी जात आहे. तर काही तरुण तुटपुंज्या वेतनावर तालुक्यातील कंपन्या व खाजगी क्षेत्रांत काम करत आहे. शहापूर तालुक्यात वाढती लोकसंख्या, वाढता शिक्षणाचा दर्जा व शासकीय उदासीनता व अकार्यक्षम लोकप्रतिनिधी यामुळे दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. ‘डोल खांब, शेणवा , किन्हवली, नडगाव , वाशिंद, कसारा, खर्डी, अघई, शहापूर या भागात आजही बेरोजगारीची समस्या भेडसावत असून अनेक तरुण बेरोजगार आहेत. वाढती बेरोजगारी ही तालुक्यातील एक मोठी समस्या मानली जात आहे. यावर आगामी काळात उपाययोजना करणे आवश्यक आहे.