Breaking News

गॅस योजनेच्या माध्यमातून मतदारसंघ चूलमुक्त करणार

अहमदनगर/प्रतिनिधी
“भाजप सरकारच्या काळात योजनांमध्ये पारदर्शीपणा आल्यामुळे सरकारच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबाला भाजप सरकारने दिलासा देण्याचे काम केले आहे. सरकारच्या योजना कागदावरच न राहता या सरकारने प्रत्यक्षात अंमलात आणल्या आहेत. सरकारच्या योजनांचा लाभ सर्वांनी घ्यावा’’, असे आवाहन आ.शिवाजी कर्डिले यांनी केले. राज्य शासनाने संपूर्ण महाराष्ट्र चूलमुक्त व धूरमुक्त करण्याचा संकल्प केलेला आहे. त्याच धर्तीवर नगर-राहुरी मतदार संघही चूलमुक्त व धूरमुक्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नगर तालुक्यातील कापूरवाडी येथे वनविभागाच्या वतीने गॅस वितरण योजनेचा शुभारंभ आ.शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते झाला. यावेळी बाजार समितीचे सभापती विलास शिंदे, संचालक संदीप कर्डिले, राम पानमळकर, शंकर पवार, कानिफनाथ कासार, संभाजी भगत, बलभीम भगत, सुनीता भिंगारदिवे, कासम शेख, मारुती कचरे, बाळासाहेब कर्डिले, सचिन तोडमल, सदाशीव धामणे, संपत धाडगे, मुन्ना शेख, मंदा भिंगारदिवे आदी उपस्थित होते.
आ. कर्डिले पुढे म्हणाले, “गॅस योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा. योजना मिळेपर्यंत तिचा उपयोग न करता गॅसचा उपयोग दररोज करावा, त्यामुळे वृक्षाची तोड होणार नाही. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा र्‍हास मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे महाराष्ट्राला दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. यासाठी वृक्षतोड न करता वृक्षारोपण व त्याचे संवर्धन प्रत्येकाने केले पाहिजे. चुलीमुळे महिलांच्या डोळ्याच्या आरोग्याबाबत प्रश्‍न निर्माण होतो. यासाठी गॅस योजनेचा फायदा सर्वांनी घ्यावा.’’
बाजार समितीचे सभापती विलास शिंदे म्हणाले, “आ.शिवाजीराव कर्डिले यांनी शासनाच्या योजना सर्वसामान्य लोकापर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे. सरकार हे समाजाचे आधारस्तंभ असते. लोकप्रतिनिधी हे सरकार आणि जनतेमधील दुवा आहे आणि ती भूमिका आ. कर्डिले यांनी पार पाडली आहे.’’