Breaking News

सोनईत ग्रामस्थांचा दोन तास ‘रास्ता रोको’

 अठरा गावे पिण्याच्या पाण्यापासून वंचित ; अनाधिकृत कनेक्शन बंद करण्याची मागणी

  सोनई/प्रतिनिधी
 सोनई-करजगाव पाणी योजना सुरळीत होण्यासाठी सोनई येथे ग्रामस्थांनी दोन तास रास्ता रोखो केला. अठरा गावे पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिल्याने ग्रामस्थांनी आंदोलन केले. माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
  यावेळी अठरा गावातील ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.ठेकेदाराच्या बेजबाबदार पणामुळे अठरा गावे पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिले असल्याचे टीका करत माजी आमदार शंकरराव गडाख यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले. योजना अपुर्ण असतांना बिले दिल्यामुळे भ्रष्टाचार झाला आहे. अधिकारी व ठेकेदाराकडून वसूल करून पाणी योजना पुर्ण करा. राहुरी तालुक्यातील अनाधिकृत कनेक्शन बंद करण्याची मागणी माजी आ. गडाख यांनी केली.
  यावेळी माजी आमदार शंकरराव गडाख यांनी तहसीलदार रूपेश खुराणा, उप अभियंता नाडगौडा, सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदिश सोनवणे, महाराष्ट्र जिवण प्राधिकरण कार्यकारी अभियंता बी.एस. अहिरे, पोलिस निरीक्षक रणजित डेरे, पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी अंनत परदेशी यांच्याशी चर्चा केली. यावेळी जि.प. सदस्य सुनिल गडाख, सभापती कल्पना पंडित, रामनाथ बडे, सरपंच संजय जंगले, शरद आरगडे, कडुबाळ कर्डिले यांनी मनोगत व्यक्त केले.