Breaking News

विविध शाळांमध्ये ‘हायजिनिक लंच ब्रेक’ स्पर्धा

अहमदनगर/प्रतिनिधी
शालेय मुलांमध्ये अधिकाधिक आरोग्यपूर्ण सवयी विकसित व्हाव्यात व कोणतेही अन्न, कोणत्याही वेळेत व कोणत्याही ठिकाणी सेवन करत असताना स्वच्छता व आरोग्यावर होणारा परिणाम या विषयी सजग व्हावे या हेतूने येथील ‘हायजीन फर्स्ट’ या सामाजिक संस्थेने ‘हायजिनिक लंच ब्रेक’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेमध्ये शहरातील अनेक शाळांनी सहभाग घेतला आहे.
स्पर्धेमध्ये शाळेतील माध्यान्ह भोजन काळातील स्वच्छतेविषयी विद्यार्थ्यांचे परीक्षण केले जाणार असून विद्यार्थ्यांनी भोजनापूर्वी, भोजनादरम्यान व भोजनानंतर कोणत्या प्रकारे स्वच्छतेविषयी काळजी घेतली, हे यातून तपासले जाणार आहे. स्पर्धेसाठी शाळांची नोंदणी केल्यानंतर दिलेल्या आठ दिवसांच्या कालावधीत हायजीन फर्स्टचे सभासद शाळांना अचानक भेट देऊन माध्यान्ह भोजन काळात तपासणी करणार आहेत.
‘स्वच्छता व अन्न सुरक्षा’ या संदर्भात जास्तीत जास्त जागरूक शाळांना हायजीन फर्स्ट संस्थेमार्फत उत्कृष्ट पारितोषिक व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तरी अधिकाधिक शाळांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन टीम हायजीन फर्स्टमार्फत करण्यात आलेले आहे.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी हायजीन फर्स्ट सभासद प्रा. डॉ. आश्‍लेषा भांडारकर, निर्मल गांधी, मयूर राहिंज, प्रा.गिरीश कुकरेजा, ईश्‍वर बोरा, गायत्री रेणावीकर, दीपाली चुत्तर, वैशाली मुनोत, अनुराधा रेकी आदी परिश्रम घेत आहेत.