Breaking News

पक्षात किती आमदार राहतील याची दक्षता घ्या :विखे

अहमदनगर/प्रतिनिधी
आघाडीचा मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांनी आपल्या पक्षात किती आमदार राहतील याची आधी दक्षता घ्यावी, असा प्रतिटोला गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांना शिर्डी येथे पत्रकारांशी बोलताना लगावला.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युतीचे सरकार चांगले काम करत आहे. जनतेचा विश्वास सरकारवर आहे. राज्यात लोकसभेला मिळालेला जनाधार विधानसभा निवडणुकीतही कायम राहील, असा विश्वास व्यक्त करतानाच मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा यापेक्षा महायुतीचाच होईल, असा दावाही त्यांनी केला. शिर्डी येथे मंत्री विखे यांनी गुरूपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर साई समाधीचे दर्शन घेतले. पत्रकारांशी बोलताना विखे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत देशातील आणि राज्यातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांना पुन्हा संधी दिली.

 राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला मोठे यश मिळाले. सरकारचे चांगले काम सुरू असल्यामुळेच जनतेने महायुतीला पाठबळ दिले. आगामी विधानसभा निवडणुकीत यापेक्षा वेगळे निकाल नसेल, २२० जागांचे उद्दिष्ट पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले.