Breaking News

बीड शहरात नो पार्किंग झोन’ चा बट्याबोळ

कुठेही वाहने उभीकरा राज्य आपलंच असल्याचे चित्र

बीड | प्रतिनिधीः-
शहरातील रहदारीच्या ठिकाणीही राजरोसपणे वाहने उभी करण्यात येत असल्याचे चित्र पहायला मिळते. त्यामुळे ’नो पार्किंग झोन’ गेले कुठे असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत, तर रस्त्यावरील उभे असलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत आहे पण वाहतूक पोलीस याकडे दुर्लक्ष करत असून, ते केवळ महसूल वाढविणे यालाच काम समजून बेशिस्त वातूकीला मोकळे रान मिळत आहे.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्काऊट भवन, बसस्थानक, साठे चौक, नगर रोडवरील प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय या परिसरात नो पार्किंग झोनचे फलक लावण्यात आलेले होते. परंतु मागील काही काळापासून हे फलक गायब झाले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना नो पार्किंग झोन चा मेळच लागत नसल्याने राज्य आपलंच म्हणत ते जागा मिळेल तिथे रस्त्यावर वाहने उभी करतात. या बेशिस्त उभ्या वाहनांमुळे रहदारीची कोंडी होत आहे. वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी असलेली वाहतूक शाखेचे कर्मचारी मात्र हे काम विसरून केवळ सावज कधी जाळ्यात अडकतो म्हणून डोळ्यात तेल घालून टक लावून पाहत असतात. या सोबत त्यांनी वाहतूकीस शिस्त लावण्यासाठी प्रयत्न करायला हवेत अशी अपेक्षा शहरवासीयांमधून व्यक्त केली जात आहे. नो पार्किंग झोन ची काटेकोर पालन केले तर साठे चौक ते स्काऊट भवन पर्यंत रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल व वाहनचालकांना दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.