Breaking News

भरकटलेल्या काँग्रेससोबत जाणार नाही : अ‍ॅड. आंबेडकर

विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत

मुंबई
काँगे्रस हा पक्ष दिशाहीन झाला असून, त्याला कोणतेही नेतृत्व राहीलेले नाही. सध्याची काँगे्रसची परिस्थिती ही नेतृत्वहीन भरकटलेला पक्ष झाला आहे. पक्षातील वरिष्ठ नेते गोंधळलेले आहेत. राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेस आता दिशाहीन पक्ष झाला आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर आघाडी करण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. अशी परिस्थिती निर्माण झाल्याने विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत वंचित बहुजन  आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत.
राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन एक महिना झाला आहे. एक महिना झाला तरी काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष कोण होईल हे स्पष्ट झालेले नाही. जर विधानसभा जागावाटपाबाबत वाटाघाटी करायच्या झाल्या तर कुणासोबत करणार? असा प्रश्‍न प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. भारिप बहुजन महासंघ  आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमने एकत्र येत वंचित बहुजन आघाडीची स्थापन केली असून, महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये होणारी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्यास आम्ही सज्ज आहोत. राज्यात एकूण 288 जागांपैकी किमान एक तृतीयांश जागांवर वंचितकडून उमेदवार उभे केले जातील, असे स्पष्टीकरणही आंबेडकर यांनी दिले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि भाजप-शिवसेना युतीचा एजेंडा स्पष्ट नाही, मात्र आमचा एजेंडासगळ्यांनाच ठाऊक आहे. त्याच्या परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत दिसून येईल. आमच्यामुळे इतर आघाड्याना फटका बसेल,  असा दावाही त्यांनी केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच काँग्रेस नेते सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. यावर प्रतिक्रिया देतांना आंबेडकर म्हणाले की, या भेटीमुळे आमच्या राजकारणावर किंवा मतांवर परिणाम होणार नाही. शिवाय मनसेला नेहमी उत्तर-भारतीय विरोधी पक्ष म्हणून मानले जाते. म्हणूनच, काँग्रेस मनसेला सोबत घेण्यास इच्छुक नाही. यामुळे काँग्रेसच्या मतदानावर मोठा फरक पडू शकतो. असेही आंबेडकर म्हणाले. वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणार्‍या उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसच्या उमेदवारांना अनेक ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला. खुद्द काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना सुद्धा याचा फटका बसला. त्यामुळे हीच पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होवू नये. यासाठी काँग्रेसकडून वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. मात्र असे असताना तिकडे, वंचित बहुजन आघाडीने एकला चलो रे चे संकेत दिले आहेत. 13, 14 व 15 जुलै रोजी विदर्भातील सर्वच विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. वंचितकडून 13 जुलै रोजी नागपूर, 14 जुलै रोजी अमरावती येथे त्यानंतर 15 जुलै रोजी अकोला वाशीम व बुलडाणा या तीन जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. यावरून काँग्रेसकडून कुठला प्रतिसाद मिळणार याची वाट न पाहता वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीत सर्व 288 जागा लढण्यासाठी तयारी सुरु केली असल्याचे दिसून येत आहे.