Breaking News

भुजबळांवर काळाने उगवलेला सूड

ज्याच्या हाती ससा तो पारधी, अशा आशयाची एक म्हण आपल्याकडे आहे. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही असेही म्हटले जाते. ज्याच्या डोक्यात सत्तेची हवा शिरते त्याची नजर अधू होते, कान बहिरे होतात, मेंदूत नशा भिनते, सार्‍या संवेदनाच ठार मरतात अशा परिस्थितीत सत्तेवर येतांना सामान्य मतदाराला दिलेले आश्‍वासन या मंडळींना कसे आठवणार? ज्यांची बुध्दीच नाठाळ झाली त्यांच्यासमोर राज्य - राष्ट्रहित काय पाणी भरणार. थोडक्यात सत्तेचा माज चढला की निवडणुकीत दिलेली आश्‍वासनं, सामान्य जनता, राष्ट्रहित-विकास या संकल्पनालाच दुय्यमच नाही तर हद्दपार ठरतात आणि मग सुरू होतो स्वार्थाचा प्रवास. याच स्वार्थांच्या प्रवासातून कारकीर्दीला ग्रहण लागते. असाच काहीचा प्रवास राज्यातील माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा सुरू आहे.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या राजकीय कारकीर्दीला लागलेला बे्रक हा त्यांच्यावर काळाने उगवलेला सूड असल्याची चर्चा नाशिकमध्ये जोरात सुरू आहे. भुजबळांनी नेहमीच राजकीय द्वेषाचे, सूडाचे राजकारण केले. अनेक वेळेस व्यक्तीगत द्वेषाचेच राजकारण करण्यांवर भुजबळांनी भर दिला. त्याची फळे आज भुजबळ भोगतांना दिसून येत आहे. नाशिक जिल्ह्यात एकेकाळी भुजबळांचे वर्चस्व होते. मात्र आज येवला-नांदगाव या त्यांच्या व मुलांच्या मतदारसंघात त्यांचे अस्तित्व शोधण्याची वेळ ीुजबळांवर आलेली आहे. राजकीय अस्तित्व शोधतांना, राजकारणांची घडी बसवतांना भुजबळांचा तोल जातांना दिसून येत आहे. नेहमी बरेजेचे राजकारण करणार्‍या भुजबळांकडून मात्र यावेळेस मात्र यावेळी वजाबाकीचे राजकारण सुरू आहे. भुजबळांचे वजाबाकीचे राजकारण आम्ही वेळोवेळी पुराव्यांसह मांडले आहे. आमच्या लेखनीद्वारे आम्ही भुजबळांना सावध करण्याचा प्रयत्न केला. मात्र भुजबळांनी टीका खिलाडूवृत्तीने न घेता, त्यात सुधारणा न करता, व्यक्तीगत द्वेषाचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भुजबळांपुढे आगामी विधानसभा निवडणुक जिकांयची कशी? असा मोठा प्रश्‍न  उभा आहे. त्यामुळेच भुजबळांना ओबीसी समाजाची उपरती झाली असून, त्यांनी ओबीसी समूदायाला गोंजारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ओबीसी समुदाय हा प्रामुख्याने छोट्या-छोट्या व्यवसायांशी निगडीत असलेला समाज आहे. जागतिकीकरणात त्याच्याकडे कला-कौशल्य असुनही भांडवलात तो मागे पडल्यामुळे त्याचे पारंपारीक व्यवसाय त्याच्या हातातून जवळपास निघून गेले आहेत. हे व्यवसाय त्याच्या उपजिवीकेचे साधन होते. ही साधने आधुनिक काळात पुन्हा मिळवायची असतील तर राजकीय व्यवस्थेत आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावे लागणार आहे. अशावेळी भुजबळ यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीमध्ये किती ओबीसी कार्यकर्त्यांना उभे केले. उद्योगधंदे काढून देण्यासाठी मदत केली. याचे उत्तर भुजबळांकडे नाही. मात्र भूतकाळात केलेले कर्माचे उत्तर आज नियती मागत आहे. पण नियतीचे काय? याचा विचार छगन भुजबळ यांनी कधी केलाच नाही. डोक्यात शिरलेली सत्तेची हवा त्यांनाच नाहीतर त्यांच्या बगलबच्च्यांनाही माज करण्यास भाग पाडीत होती. अगदी गृहमंत्रीपदापासूनचा काळ आठवा. भुजबळ तर फारच दुरची गोष्ट. ठिकठिकाणी कार्यरत असलेले भुजबळांचे बगलबच्चे स्थानिक पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍याला किरकोळ कारणावरूनदेखील शिव्यांची लाखोली वाहायचे हाच अनुभव सार्वजनिक बांधकाम खात्यातील कनिष्ठ अभियंत्यापासून बांधकाम अभियंतापर्यंत सर्वच अभियंत्यांनी घेतला. मात्र नियतीच्या दरबारात न्याय होणार हे ठरले होते. त्याचाच अनुभव आज भुजबळ घेत आहेत. सत्तेत केलेला माज आज कपाळावर हात मारून घेण्यास कारणीभूत ठरला आहे.