Breaking News

नूतन विद्यामंदिरच्या वृक्ष-ग्रंथ दिंडीने वेधले भगूरकरांचे चित्त

देवळाली कॅम्प/प्रतिनिधी
शिक्षण मंडळ भगूर संचलित नूतन विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक, तसेच वासुदेव अथणी इंग्लिश मिडीयम स्कुलच्या वतीने आषाढी एकादशी निमित्ताने भगूर शहरात वृक्षदिंडी व ग्रंथदिंडी सोहळा पार पडला.
महाराष्ट्राच्या थोर वारकरी, वैष्णव संप्रदाय, संत परंपरेचे दर्शन दिंडी सोहोल्यात घडवण्यात आले. विठ्ठल रुक्मिणी, संत तुकाराम, संत ज्ञानदेव, संत सोपान, संत एकनाथ ,संत मुक्ताबाई यांच्या वेशभूषा धारण केलेले पात्र चित्ररथावर स्वार झाले होते.100 विद्यार्थ्यांचे ढोल, ताशासह भव्य लेझीम पथकाने भगूर करांचे चित्त वेधले. प्रारंभी शालेय प्रांगणात वृक्ष लागवड करण्यात आली. वृक्ष आणि ग्रंथ दिंडीचा शुभारंभ शिक्षण मंडळ भगूरचे कार्यवाह मधुसूदन गायकवाड, वृक्षमित्र तानाजी भोर, मुख्याध्यापक अण्णासाहेब डावरे, उपमुख्याध्यापक अशोक बोराडे, पर्यवेक्षक बाळासाहेब केदारे, वासुदेव अथणीच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ रत्ना पिल्ले यांच्या उपस्थितीत झाला.
दिंडीच्या पालखीचे पूजन विहिप चे नेते व संस्थेचे कार्याध्यक्ष एकनाथराव शेटे, ह.भ.प. गणेश महाराज करंजकर, सहकार्यवाह अनिल कवडे, अथणी शाळेच्या पर्यवेक्षक रुषाली कातकाडे, उच्च माध्य. गणेश चव्हाण, शिक्षकसेवक प्रतिनिधी जितेंद्र भावसार, भारती चौधरी, विजय सानप, वैशाली गायकवाड यांच्या हस्ते झाले. दिंडी सोहळ्यात वारकरीच्या वेशातील विद्यार्थी टाळ मृडुंगाच्या तालावर भजने गात असल्याने आषाढी पायी वारीची  अनुभूती येत होती. शाळेतील मुलींनी नऊवारी पातळ नेसून, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन दिंडी सोहोल्यात रंगत आणली. लेझीम पथकाला अनिल ढोकणे, निवृत्ती डुकरे, जीवन गायकवाड, मोतीराम पावशे, संदीप शेटे यांनी मार्गदर्शन केले.
वेशभूषा करणार्‍या मुलांची सजावट संदीप गायकवाड , विशाल शिरसाठ, ललित भदे, देविदास वारूगसे यांनी केली. दिंडी सोहळ्यात भगूर गावातील प्रत्येक चौकात रिंगण तयार करून वारकर्‍यांच्या खेळातील प्रात्यक्षिके करण्यात आली. शालेय शिक्षिकांनी व मुलींनी फुगड्या खेळून वारीचा आनंद लुटला. कार्यक्रमात सुनील कापसे, निलेश गोसावी, हरी पवार, दीपक कोकणी, भास्कर गवळी, रेवती जाधव, पल्लवी बोराडे, मंदा संगमनेरे, शुभांगी अग्निहोत्री, शाळेतील सर्वं शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदी सहभागी झाले होते.