Breaking News

अमेरिकेन अध्यक्षाचे उत्तर कोरियात पहिले पाऊल!

दोन्ही देशांतील तणाव दूर होण्यास मदत; ट्रम्प-उन यांच्यात चर्चा

प्याँगयाँग
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे हुकूमशाहा किम जोंग उन यांची भेट घेतली. ट्रम्प यांनी अमेरिकेच्या इतिहासातील एक महत्वाचे पाऊल आज टाकले. त्यांनी उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियाच्या सीमेवर जाऊन उन यांची भेट घेतली. अमेरिकेच्या इतिहासात आजवर कोणत्याही राष्ट्राध्यक्षाने उत्तर कोरियामध्ये पाऊल ठेवलेले नाही. दरम्यान, ट्रम्प आणि उन यांच्यामधील ही तिसरी भेट ठरली. या भेटीमुळे दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला तणाव कमी होईल असे मानले जात आहे.

या ऐतिहासिक भेटीसाठी ट्रम्प दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया या दोन्ही देशांना विभागणार्‍या काँक्रिटच्या सीमाभिंतीजवळ पोहोचले. या ठिकाणी उन यांनी त्यांचे हस्तांदोलन करीत स्वागत केले. त्यानंतर दोघांनी उत्तर कोरियाची सीमा ओलांडून पुढील प्रवास सुरू केला. तत्पूर्वी ट्रम्प यांनी उत्तर कोरियाच्या सीमेवर पाऊल ठेवताच उन यांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन करीत छायाचित्रही काढून घेतले. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी दक्षिण कोरियाच्या दिशेने चालत जाऊन तिथे उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी ट्रम्प म्हणाले, की जगासाठी हा एक मोलाचा क्षण असून इथे येणे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे.

यापूर्वी ट्रम्प यांनी स्वतः या गोष्टीची माहिती दिली होती, की ते किम जोंग उन यांची भेट घेण्यासाठी कोरियाच्या सीमेवर जाणार आहेत. त्यांनी सांगितले होते, की दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियाच्या सीमेवरील सैन्याच्या ताब्यात नसलेल्या जागी जाऊन किम जोंग उन यांच्याशी बैठक करणार आहोत. आम्ही खूपच चांगले संबंध प्रस्थापित केले आहेत, असेही ते म्हणाले होते.