Breaking News

‘बा विठ्ठला चांगला पाऊस पडू दे’

मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे

पंढरपूर 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाटेवर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विचारावरच राज्य शासनाचे काम सुरू आहे. राज्यातील जनतेच्या मनातील आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही काम करत असून राज्यात चांगला पाऊस पडू दे दुष्काळाचं सावट दूर करून महाराष्ट्राला सुजलाम् सुफलाम करण्याचे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विठ्ठलाच्या चरणी घातले.
आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा मानाचे वारकरी विठ्ठल चव्हाण आणि प्रयागबाई चव्हाण (लातूर) या दाम्पत्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केली. महापूजेनंतर विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने मानाच्या वारकर्‍यांचा सत्कार मंदिराच्या सभामंडपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे, सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, विठ्ठल मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंढरपूरच्या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. महाराष्ट्रात परकीय आक्रमणांच्या काळात धर्म आणि संस्कृती जिवंत ठेवण्याचे काम वारी आणि वारकर्‍यांनी केले. गेल्या अनेक वर्षांपासून शिस्तबद्ध पद्धतीने दिंड्या निघतात. त्यामुळे सकारात्मक वातावरण तयार होते. या सकारात्मक शक्तीचा वापर महाराष्ट्राला हरित, समृद्ध आणि वनाच्छादित करण्यासाठी करण्यात येणार आहे. सामाजिक संस्थांच्या मदतीने शेकडो वर्षांची परंपरा असणारी ही वारी निर्मल आणि स्वच्छ करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी वारकर्‍यांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.जनभावना आणि जनभावनेचा आदर करण्याची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला दिली. याच प्रेरणेतून मराठा आणि धनगर समाजाला न्याय देण्याचे काम केले असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षात मंदिर समितीच्या वतीने सुरू असलेल्या कामांची प्रशंसा करून चंद्रभागा नदीच्या शुध्दीकरणासाठी शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘नमामि चंद्रभागा’ अभियानाला यशस्वी करण्यासाठी सर्व वारकर्‍यांनी त्यात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.



मराठा समाजाकडून मुख्यमंत्र्यांचा सत्कार
जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण देणार नाही तो पर्यंत मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीची शासकीय महापूजा करू देणार नाही, अशी भूमिका मराठा समाजाच्या वतीने मागल्या वर्षी घेतली होती. त्यामुळे मागच्या वर्षी मुख्यमंत्र्याना विठ्ठलाची महापूजा करता आली नाही. मात्र नुकताच मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला, न्यायालयाच्या या निर्णयानंतर मागच्या वर्षी महापूजेपासून रोखणार्‍या सकल मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पंढरपूरात जंगी सत्कार करण्यात आला.

15 लाख भाविकांची मांदियाळी
महिन्याभरापासून महाराष्ट्रासह शेजारील राज्यांतून पायी चालत निघालेले लाखो वारकरी पंढरीत दाखल झालेले आहेत. शुक्रवारी साजर्‍या होत असलेल्या आषाढी एकादशीसाठी सुमारे 10 लाखांहून अधिक भाविकांच्या मांदियाळीने पंढरीत भक्तिसागराची लाट चौफैर दिसत आहे. चंद्रभागेचे स्नान आणि दर्शन विठ्ठलाचे घडावे मज जन्मोजन्मी अशी प्रत्येक वारकर्‍याची इच्छा असते. अशी इच्छा घेऊन आज हजारो वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहे. चंद्रभागा स्नान, नामदेव पायरीचे दर्शन, नगर प्रदक्षिणा करून पंढरीची वारी पोहोचवली जात आहे. पंढरपूर शहरात सर्वत्र टाळ, मृदंगाच्या गजराने वातावरण वैष्णवमय झाले आहे. यावरून ‘भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली’ असल्याचे दिसत आहे.