Breaking News

वीजचोरी प्रकरणी कारखानदारास दोन वर्ष कारावास व सव्वा कोटींचा दंड

नाशिक/प्रतिनिधी
वीजमीटरमध्ये फेरफार करुन 52 लाख 65 हजारांची वीजचोरी केल्याप्रकरणी ठाणे येथील अबूतालिक शमशुद्दीन खान या प्लास्टीक उत्पादक कारखानदाराला ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश श्री. पी.पी. जाधव यांनी दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा नुकतीच सुनावली आहे. तसेच या प्रकरणात न्यायालयाने वीजचोरीच्या रकमेच्या तिप्पट सुमारे सव्वा कोटींचा दंड भरण्याचे आदेश आरोपीला दिले आहेत.
महावितरण कंपनीच्या भरारी पथकाने 14 जानेवारी 2004 रोजी ठाण्यातील शीळ, महापे येथील आरोपी अबूतालिक खान याच्या प्लास्टिक उत्पादक कारखान्याची तपासणी केली असता संबंधित कारखान्याच्या वीजमीटरमध्ये फेरफार केल्याचे आढळून आले. मीटरचे सील तोडून 34 महिन्यांपासून सुमारे 10 लाख 32 हजार 26 युनिटची वीजचोरी होत असल्याचे निदर्शनास आले. वीजचोरीची एकूण रक्कम 52 लाख 65 हजार 430 रुपये होत असल्याने भरारी पथकाने अबूतालिक खान यांच्याविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात विद्युत कलम 135, 138 नुसार गुन्हा दाखल केला होता.
न्यायालयात सादर करण्यात आलेले पुरावे ग्राहय मानून न्यायालयाने अबूतालिक खान याला दोन वर्ष सश्रम कारावास व सव्वा कोटी रुपयांचा दंड तसेच दंड न भरल्यास 1 वर्षाच्या साध्या कैदीची शिक्षा सुनावली.