Breaking News

पाथर्डी तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ

पाथर्डी/प्रतिनिधी   
  तालुक्यातील कोरडगाव येथे बुधवारी रात्री तीन ठिकाणी चोर्‍या होऊन सुमारे पन्नास हजाराचा ऐवज चोरीला गेला आहे. यामध्ये दोन दुकानांचे शटर उचकटून रोख रक्कम व दुकानातील सामान तर एका ठिकाणी मोटार सायकल चोरीला गेली आहे. याबाबत पाथर्डी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील कोरडगाव येथे बोधेगाव रस्त्यावरील दीपक देशमुख यांच्या मोबाईलच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी रोख रकमेसह सुमारे 18 हजार दोनशे रुपयांचा ऐवज चोरून नेला. त्याचबरोबर त्याच्या शेजारील कानिफनाथ काकडे यांच्या बालाजी पान स्टॉल या टपरीचे शटर उचकटून दहा हजार रुपयाचे बॉडी स्प्रे व दोन हजार तीनशे रुपये रोख असे बारा हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. दुकानाच्या पाठीमागे राहत असलेल्या सलीम शेख यांची वीस हजार रुपये किमतीची मोटर सायकल चोरांनी चोरून नेली . या तिन्ही घटनेमध्ये चोरट्यांनी एकूण 50 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याबाबत दीपक अशोक देशमुख यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल रेवन्नाथ रांजणे करत आहेत.