Breaking News

स्पाईस जेटच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड

16 तासांपासून मुंबई विमानतळावर खोळंबले 130 प्रवासी

मुंबई
छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावर स्पाईस जेट विमानामध्ये तात्रिंक बिघाड झाला आहे. त्यामुळे 130 प्रवासी विमानतळावर तब्बल 16 तासांपासून अडकले आहेत. चिडलेल्या प्रवाशांनी याबाबत नागरी उड्डाण संचालन विभागाकडे (डीजीसीए) ट्विटरवरुन तक्रार केली आहे.
स्पाईस जेटचे एसजी 6354 हे विमान शुक्रवारी सकाळी 130 प्रवाशांना घेऊन मुंबईहून दुर्गापूरला जाणार होते. मात्र, शुक्रवारी तांत्रिक अडचणींमुळे हे विमान स्पाईस जेट कडून रद्द करण्यात आले. त्यानंतर 130 प्रवाशांना शनिवारी पुन्हा विमानतळावर बोलविण्यात आले. तब्बल 16 तास उलटूनही प्रवाशांना विमानात बसू न दिल्यामुळे वैतागलेल्या काही प्रवाशांनी ट्विटरच्या माध्यमातून स्पाईस जेटची तक्रार डीजीसीएकडे केली आहे. दिरंगाईबद्दल स्पाईस जेट कडून खुलासा करण्यात आला आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे विमानाचे उड्डाण उशिरा होत असून लवकरात लवकर यावर तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे स्पाईस जेटने ट्विटरुन स्पष्ट केले आहे. प्रवाशांना होणार्‍या त्रासाबद्दल स्पाईस जेटने दिलगिरी व्यक्त केली आहे.