Breaking News

मधल्या फळीत प्रयोग करणे भारताला पडले महागात

नवी दिल्ली
विश्‍वचषक जिंकण्याचे स्वप्न उराशी बाळगून भारतीय संघ इंग्लंडमध्ये पोहचला. साखळी सामन्यांतील भारतीय संघाची कामगिरी स्वप्नवत होती. त्यामुळे भारतीय संघ विश्‍वचषक सहज जिंकेल असे वाटत होते. कारण भारतीय फलंदाजी ही बहरत होती. मात्र मधल्या फळीत सातत्याने प्रयोग करण्याच्या सवयीमुळे भारताने शानदार प्रदर्शन करून देखील विश्‍वचषक जिंकता आलेला नाही.
साखळी सामन्यात आघाडीच्या फलंदाजानी आपले योगदान दिलेच. रोहित शर्माने लगावलेले पाच शतक, शिखर धवन, के.एल राहूलचे शतक, विराट केाहलीचे पाच अर्धशतक, हे आघाडीची फळी मजबूत असल्याचे दर्शवित होती. मात्र एखाद्या सामन्यांत आघाडीच्या फलदांजानी हाराकिरी केली, तर मधली फळी हा भार पेलू शकेल, यादृष्टीने भारतीय व्यवस्थापनाने, निवड समितीने निर्णय घेण्याची गरज होती. मात्र ही चूक आज भारताला महागात पडल्याचे दिसून येत आहे. दिनेश कार्तिकला संधी मिळाली असली, तरी त्याला मोक्याच्या क्षणी संधीचे सोने करता आलेले नाही. विजय शंकर, दिनेश कार्तिक, केदार जाधव या फलंदाजांना खेळविण्याची घाई, विश्‍वास न ठेवता, लगेच बदल करण्याची घाई, यामुळे मधली फळी नेहमीच डळमळीत राहिली. जडेजा ला संधी मिळाल्यानंतर त्यांने क्षेत्ररक्षण, गोलदांजी, आणि फलंदाजीमध्ये केलेली कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे. मात्र जडेजाला देखील खेळण्याची संधी ही शेवटच्या सामन्यांत देण्यात आली. अंजिक्य रहाणे, याला जर शिखर धवनच्या जागी सलामीला खेळवता आले असते, आणि के. एल. राहूलला मधल्या फळीत खेळवता आले असते, तर आज भारताला हार पत्करावी लागली नसती. दुसरे म्हणजे, पाऊस पडल्यामुळे मैदान ओलसर होते. त्यामुळे सुरूवातीच्या 10 ओव्हर सांभाळून खेळणे गरजेचे असतांना, फलंदाजांना उतावीळपणा नडला असेच म्हणावे लागेल. सचिन तेंडुलकरने सामन्याचे आणि भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचे विश्‍लेषण केले आहे. प्रत्येकवेळा आपण आघाडीच्या फळीतील खेळाडूंच्या कामगिरीवर अवलंबून राहू शकत नाही. इतर फलंदाजांनीही आपली जबाबदारी ओळखून खेळायला हवं. उपांत्य सामन्यातील महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा यांच्या संघर्षपूर्ण खेळीचे सचिन तेंडुलकरने कौतुकही केले. परंतु भारतीय फलंदाजी ही नेहमीच आघाडीच्या तीन फलंदाजावर अवलंबून राहू शकत नाही असेही सचिनने म्हटले आहे. सचिन म्हणतो, ‘ भारताच्या पराभवामुळे मी निराश झालो आहे. 240 धावांचे लक्ष मोठं नव्हते. पण भारतीय फलंदाजांनी केलेल्या हराकिरीमुळे पराभवाला सामोरं जावं लागले. भारताच्या आघाडीच्या फळीतले 3 फलंदाज केवळ एक धाव काढून माघारी परतले. पहिले 3 फलंदाज माघारी परतल्यानंतर धोनीने मैदानात येणं गरजेचं होतं. मात्र दिनेश कार्तिक मैदानात आल्यामुळे सर्वांना आश्‍चर्याचा धक्का बसला. भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही या निर्णयाबद्दल आश्‍चर्य व्यक्त केलं. समालोचनादरम्यान गांगुलीने भारतीय संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर टीका केली. 3 विकेट गेल्यानंतर धोनीला संधी न मिळणं ही गोष्ट खरचं अनाकलनीय आहे. ज्या क्षणी भारताला धोनीची गरज आहे, त्यावेळी तो मैदानात नाहीये. ही गोष्ट अत्यंत चुकीची असल्याचे मत सौरव गांगुलीने व्यक्त केले आहे.

भारताच्या विरोधात गेलेल्या बाजू
भारताने जर या मॅचवेळी टॉस जिंकला असता तर भारतीय फलंदाजानी दबावमुक्त खेळ करत न्यूझीलंडसमोर तगडे आव्हान उभे केले असते. मात्र भारताने टॉस हारणे न्यूझीलंडच्या पथ्यावर पडले. दुसरे, न्यूझीलंडची फलंदाजी संपत असतांना म्हणजे उणीपूरी चार ओव्हर बाकी असतांना, पाऊस पडल्यामुळे ही बाब देखील न्यूझीलंडच्या पथ्यावर पडली. पाऊस जर दुसर्‍या दिवशीही सुरू असता, तर भारतीय संघ ऐटीत अंतिम फेरीत दाखल झाला असता. मात्र सर्वच बाजून भारताची कोंडी झाली असेच म्हणावे लागेल.