Breaking News

जातीबाहेर लग्न केल्याने भाजप आमदाराकडून मुलीच्या जीवाला धोका

नवी दिल्ली
उत्तरप्रदेशातील बरेली जिल्ह्यातील चैनपूर मतदारसंघातील आमदार राजेश मिश्रा यांच्यापासून आपल्या जीवाचा धोका असल्याचा आरोप त्यांच्याच मुलीने केला. आपल्या कुटुंबीयांपासून लपत-छपत राजेश मिश्र यांची मुलगी साक्षी हिने 4 जुलै रोजी प्रयागराजच्या राम-जानकी मंदिरात दलित तरुणासोबत प्रेमविवाह केला. फरीदपूरच्या आमदाराच्या भाचा असलेल्या या तरुणाचे नाव अजितेश कुमार असे आहे. साक्षी आणि अजितेशने नुकतेच वैदिक हिंदू परंपरेनुसार विवाह केला. यानंतर मात्र, आपल्या कुटुंबाकडून आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचे सांगत साक्षीने अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करत सुरक्षेची मागणी केली. साक्षीची ही याचिका न्यायालयाने स्वीकारली. या याचिकेत साक्षीने आपण सज्ञान असून मर्जीने विवाह केल्याचे म्हटले आहे. याअगोदर सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत साक्षीने ’आपल्याला आपल्याच वडिलांकडून, भावाकडून आणि त्यांच्या जवळच्यांकडून आपल्या आंतरजातीय लग्नाला विरोध आहे. त्यामुळे आपल्या आणि पतीच्या जीवाला धोका असल्याचे’ म्हटले आहे. एवढेच नाही तर बरेलीच्या पोलिसांवरही आमदार असलेले वडील दबाव टाकत असल्याचा आरोप तिने या व्हिडिओमध्ये  केला आहे.


माझ्या मुलीला निर्णय घेण्याचा अधिकार
साक्षीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर साक्षीचे पिता, भाजप आमदार राजेश मिश्रा यांनी एक प्रेस रिलीज जाहीर केले. यामध्ये आपली मुलगी सज्ञान असून तिला तिचे अधिकार घेण्याचा अधिकार आहे. कुणीही त्यांना ठार मारण्याची धमकी दिलेली नाही. माझ्याकडून कुणालाही धोका नाही’ असे या पत्रकात म्हटले आहे.