Breaking News

प्रीतम मुंडेच्या अडचणीत वाढ

शपथपत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका

बीड
बीड लोकसभा मतदारसंघातून दुसर्‍यांदा विजय मिळविणार्‍या भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रीतम मुंडे यांनी शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यानच अपक्ष उमेदवार कालिदास आपेट यांनी प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर आता कालिदास आपेट यांनी वकिलांमार्फत प्रीतम मुंडे यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. ’प्रीतम गोपीनाथ मुंडे’ नावाने बीड जिल्ह्यातील नाथरा येथे मतदार यादीत प्रीतम यांचं नाव आहे. तर मुंबई येथील वरळीमध्ये प्रीतम गौरव खाडे नावाने त्यांचं मतदार यादीत नाव असल्याचा आरोप कालिदास यांच्याकडून करण्यात आला आहे.ा मुंबईतील वरळी येथील प्लॉट 1201 स्थावर मालमत्तेची माहिती प्रीतम मुंडे यांनी लपवली असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. प्रीतम मुंडे यांच्याकडे वेगवेळ्या नावाने आयकर विभागाचे दोन ओळखप्रत्र आहे असंही याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. प्रीतम मुंडे या वैद्यनाथ बँकेच्या संचालक मंडळात सहभागी आहेत. त्यांच्यावर गंभीर स्वरूपाच्या गुन्हयाची माहिती त्यांनी लपवली. दरम्यान, प्रीतम मुंडे यांच्याबाबत या चार मुख्य आक्षेपांसह एकूण सहा आक्षेप नोंदवण्यात आलेले आहेत. त्यामुळे याचिकाकर्त्याच्या आरोपात तथ्य आढळल्यास प्रीतम मुंडे यांचं पद धोक्यात येऊ शकतं. लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघात प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा पराभव केला. यावेळीची निवडणूक प्रीतम मुंडे यांच्यासाठी आव्हानात्मक ठरेल, असं बोललं जात होतं.