Breaking News

आता नको रे अंत पाहूस

हे पावसा असा काय झाला रे अमुचा गुन्हा?
नाही कसा सुटत तुला अमृताचा पान्हा?
बघ ना रे माझा शेतकरी राजा आहे रे व्याकुळ तहाना।
उपाशीच झोपत आहे त्याचा कान्हा।
हंबरत आहेत गाई गुरे राना वना।
नाही कसा सुटत तुला अमृताचा पान्हा?
हे पावसा धरती माय अन् तू बाप ना रे।
बापाचे कर्तव्य तू असा कसा विसरलास?
आपुल्याच मुलाना अनाथ करूनी
तू कोठे गायब झालास?
  तुझेच चक्र तू विसरलास।
अन् तुझ्याच पुत्राला दृष्टचक्रात अडकवून गेलास॥
कर्ज सावकार हाच त्याचा शापित विळखा।
नको रे असा अंत पाहूस हे पावसा॥
नाही आता आळवणार कुणी राग मल्हार।
न्यायासाठी खटला तुझ्यावरी टाकणार!।
जोपर्यंत तू नाहीच बरसणार।
धरतीमातेच्या न्यायासाठी तुला यावेच लागणार।
तुला यावेच लागणार॥


कल्याणच्या रेश्मा चव्हाण यांची ही कविता आठवावी आणि तिच्यातील दाहकता आता अनुभवायला मिळावी, हा विलक्षण योगायोग आहे. एकीकडं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पंढरपूरला विठूरायाला असंच साकडं घालीत असताना दुष्काळमुक्तीच्या आमच्या प्रयत्नांना साथ देण्याचं आवाहन करीत आहेत आणि दुसरीकडं महाराष्ट्रात गेल्या दीडशे वर्षांत पाहिला नाही, असा कोरडा दुष्काळ अनुभवायला येतो आहे. जुलैचा पंधरवडा संपत आला, तरी अजून राज्याचा निम्म्याहून अधिक भाग कोरडाठाक आहे. यापूर्वी दुष्काळ पडले; परंतु अन्नधान्याच्या टंचाईत ते कुठूनही उपलब्ध करता आलं. आता पाणी कुठून आणायचं, हाच गंभीर प्रश्‍न आहे. अजूनही राज्यात हजारो टँकर सुरू असतील आणि धरतीमाता पावसाच्या विरहानं व्याकूळ झालेली असेल, तर तिची व्याकुळता आणखी वाढवू नको रे बाबा! तुझं असं रुसणं लाखोंच्या पोशिंद्याच्या हृदयाला किती जखमा करून जात असेल, त्याचा तरी विचार कर ना? गेल्या दोन वर्षांपासून त्यानं डोळ्याला पदर लावून काळ्या आईपासून फारकत घेतली आहे. हाता-तोंडाची गाठ पडावी, म्हणून त्यानं शहरांचा आधार घेतला आहे. काळजावर दगड ठेवून खुंटीची जनावरं सोडून दिली आहेत. किमान त्या मुक्या जनावरांची तरी दया येऊ दे रे प्राणप्रिय सख्या! माझ्यासाठी नाही, तरी इतरांसाठी तरी ये, असं साकडं आता धरणीमाय घालीत आहे.

मेघदूता,
कालिदासाच्या काव्यातून तू अमर झालास. देवदूत म्हणून तू धावून ये. तुझ्या प्रेयसीची ओढ तरी समजून घे. तिचा जीव तुझ्या विरहानं कासावीस झाला आहे. तिला पडलेल्या आक्राळविक्राळ भेगा म्हणजे तिचं हृदय किती भेगाळलं आहे, तिची तृष्णा तूच भागवू शकतोस रे! एरव्ही तू संपूर्ण देश व्यापून टाकतोस ना? आता तू असा थकल्यासारखा का झालास? मिलनाची ओढ तुला नाही का रे ? देशातील एकूण 36 हवामान विभागांपैकी केवळ 12 विभागांवर तुझी मर्जी झाल्याचे दिसते. 24 हवामान विभागांत तू फिरकलास नाही. खरं तर जुलै हा ुतझ्या बरसण्याचा हमखास काळ. तरीही तू पाठ फिरवली. आषाढी एकादशी झाल्यानंतरही राज्यात काही भाग वगळता
तुला अजून जावंसं का वाटलं नाही? बळीराजाचा आर्त टाहो तुझ्या हृदयाला पाझर का फोडत नाही? इतका का तू निष्ठूर झालास? आमचं काही चुकलं असेल, तर उदात्त अंतकरणानं त्या पोटात घे. किमान मुख्यमंत्र्यांचं तरी ऐक. त्यांचं दुष्काळ हा भूतकाळ ठरविण्याचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी तरी ये. तुझ्या येण्यानं धरती कशी मोहरून येते. तिचं रुपडं कसं खुलतं, आसमंतात आनंदाचं उधाण येतं. तिचं हिरवं शालूतलं रुपडं मनमोहक असतं. तिच्या या रुपड्यावर प्रेमकविता फुलतात. प्रियकर-प्रेयसीला ओल्या चिंब पावसात भिजण्यातला आनंद किती अवर्णनीय असतो, म्हणून सांगू. तुझ्या येण्यानं अनेकांना रोजगार मिळतो. नद्या-नाल्या दुथडी भरून वाहिल्यानं आसमंतात एक चैतन्याचा झरा उत्साहानं वाहत असतो. तुझं न येणंही कसं हुरहुर लावणारं असतं, हे आता चांगलंच अनुभवायला आलं आहे.

बा पावसा,
तू येणार नाही, म्हटलं की तिकडं रिझर्व्ह बँकेच्या पोटात गोळा आला आहे. महागाई नावाचा राक्षस तर कधीच बाटलीतून बाहेर निघाला आहे. सरकार नावाच्या यंत्रणेला तुझं न येणं चिंता वाटायला लावणारं आहे. मेघराजा, तू असा पक्षपातीपणा का करतो रे? सह्याद्रीचा घाटमाथा ओलांडून एकदा संपूर्ण महाराष्ट्र चिंब भिजवून काढ. मराठवाडा, विदर्भ, नगर, सोलापूरकरांच्या अंगाअंगातून पाणी निथळू दे. महाराष्ट्रातील 160 तालुक्यांमध्ये 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला असून पावसाळ्याचा दीड महिना उलटून गेला तरी निम्म्याहून अधिक महाराष्ट्रातील शेतकरी खरिपाच्या पेरण्यांसाठी खोळंबले आहेत. जमिनीचं पोट अंकुरासाठी आसुसलेलं आहे.
आतापर्यंत खरिपाच्या 75 टक्के पेरण्या अपेक्षित असताना राज्यात अवघ्या 43 टक्के पेरण्या झाल्या आहेत. नगर जिल्ह्यातील काही तालुक्यात तर सरासरीच्या वीस टक्केही पाऊस झालेला नाही. राज्याच्या निम्म्या भागावर दुष्काळाची गडद छाया पडली आहे. कोकण, नाशिक आणि पुणे-कोल्हापूरचा काही भाग वगळला, तर धरणांची पोटं खपाटीला गेली आहेत. हे तुला कसं पाहावतं रे राजा? राज्यातील 3267 धरणांमध्ये 17.52 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच काळात 28.77 टक्के पाणीसाठा होता. अजूनही 4532 टँकरातून राज्याला पाणीपुरवठा सुरू आहे. आषाढी एकादशी संपली, तरी बर्‍याच भागात अद्याप तिफणीवर मूठ बसलेली नाही. अलीकडच्या काळात तुझा स्वैराचार वाढला आहे. तू कधीही येतो. आला, की एकदाच बरसून जातो आणि पुन्हा लवकर फिरकत नाहीस. तुझा हा अनियमतपणा आता तरी सोड रे!  नैसर्गिक ते नैसर्गिक. कृत्रिम पावसाचा विचारसुद्धा मनात येणार नाही, इतकं तू भिजवून टाक. भलेही झोडप. तुझ्या झोडपण्यातही आनंदच असेल. तेव्हा आता तू जास्त अंत पाहू नकोस.