Breaking News

मुंबईत उभी राहणार 100 वने

मुंबई 
हवा आणि सागरी प्रदूषणाने घुसमटलेल्या मुंबईत आल्हाददायक हिरवाई वाढवण्याचा प्रयत्न महापालिका करणार आहे. त्यासाठी 100 ठिकाणी जपानी तंत्राच्या ‘मियावाकी’ पद्धतीची शहरी वने विकसित करण्याचे ठरवले आहे. या वनांसाठी  60 ठिकाणे निश्‍चित करण्यात आली असून, उर्वरित  40 ठिकाणे येत्या काळात ठरवली जाणार आहेत. 60 ठिकाणांसाठी लवकरच निविदा मागविण्यात येणार आहे. कॉर्पोरेट क्षेत्राच्या मदतीने ही वने उभारली जाणार असून, त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास पालिका स्वत: ती उभारणार आहे. 
मियावाकी हा जपानी वृक्षतज्ज्ञ असून, त्यांच्या तंत्रानुसार झाडे लावल्यास सामान्य उद्यानांच्या किंवा वनांच्या तुलनेत झाडांची वाढ झपाट्याने होते. विशेष म्हणजे, देशी झाडांना हे तंत्र उपयुक्त असून, ती भारतीय हवामानात योग्य पद्धतीने वाढतात. एरवी सामान्य पद्धतीने लावलेले झाड वाढण्यास जेवढा कालावधी लागतो, त्यापेक्षा निम्म्यापेक्षा कमी कालावधीत तेवढ्याच उंचीचे झाड वाढते. साधारणपणे दोन वर्षांत विकसित होणार्‍या ‘मियावाकी’ पद्धतीच्या वनांमध्ये झाडांमधील अंतर हे कमी असल्याने ती घनदाट असतात, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.