Breaking News

रिलायन्सची गिगाफायबर सेवा 1600 शहरांत

मुकेश अंबानी यांची घोषणा; टीव्ही आणि सेटटॉप बॉक्सही मोफत

नवी दिल्ली
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. रिलायन्सने जिओ गिगाफायबरची बंपर लॉटरी फोडली आहे. त्यामुळे पुन्हा बाजारात खळबळ उडणार आहे. सुरुवातीला 1600 शहरांमध्ये सेवा सुरू करण्यात येणार आहे. जिओ गिगाफायाबरच्या प्लॅनची सुरुवात 700 रुपयांपासून आहे. हे प्लॅन 10 हजार रुपयांपर्यंत आहेत. फायबर अ‍ॅन्युअल वेलकम ऑफरअंतर्गत 4 डी/4 के टीव्ही आणि त्याचसोबत 4के ची मजा लुटण्यासाठी सेट अप बॉक्स मोफत मिळणार आहे. गिगाफायबरची सेवा येत्या पाच सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

जिओ फायबरचा डेटा प्लॅन 700 रुपयांपासून सुरू होणार आहे. त्याचा वेग 100 एमबीपीएस असेल. त्यामध्ये ग्राहकांना ब्रॉडबँड,  जिओ होम टीव्ही आणि जिओ एलओटी सेवा मिळणार आहे. जिओ लँडलाईन सेवा मोफत देणार आहे. यामध्ये आयएसडी कॉलिंगचे दर हे इतर कंपन्यांपेक्षा दहा पटींनी कमी असणार आहेत. या टेरिफची माहिती पाच सप्टेंबरला जिओच्या वेबसाईटवर मिळणार आहे. इंटरनेटचा वेग 1000 एमबीपीएस ते एक जीबीपीएस एवढा प्रचंड असणार आहे. यामध्ये डिजिटल टीव्हीसोबत क्लाऊड गेमिंगही करता येणार आहे. याशिवाय जिओने पोस्टपेड प्लस ही सेवाही लाँच केली आहे. त्यामध्ये फॅॅमिली प्लॅन्स, डाटा प्लॅन, आंतरराष्ट्रीय रोमिंग, फोन अपग्रेडस्, होम सोल्यूशन तुमच्या फोनमध्ये उपलब्ध असणार आहेत.

जिओने आणखी एक जबरदस्त प्लॅन लाँच केला आहे. जिओ फायबर ग्राहकांनी जर जिओ फॉरेव्हर प्लॅन घेतल्यास त्यांना खूप काही मिळणार आहे. यामध्ये एचडी 4 के टीव्ही आणि सेट टॉप बॉक्स मोफत मिळणार आहे. प्रीमियम जिओ ग्राहक सिनेमे रिलीजच्या दिवशीच घरबसल्या पाहता येणार. जिओने या प्लॅनला फर्स्ट डे फर्स्ट शो असे नाव दिले आहे. ही सेवा 2020 पासून सुरू होणार आहे. रिलायन्स उद्योग समूहात आतापर्यंतची सर्वांत मोठी परकीय गुंतवणूक होणार असल्याची घोषणा अंबानी यांनी केली. रिलासन्स उद्योग 2018-19 आर्थिक वर्षात सर्वाधिक नफा कमावणारा समूह असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. सौदी अराम्को रिलायन्समधील 20 टक्के शेअर्स खरेदी करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. अराम्कोकडून रिलायन्समध्ये 5.25 लाख कोटींची गुंतवणूक केली जाईल.


दररोज पाच लाख पिंप तेल मिळणार
रिलायन्सच्या ऑईल टू केमिकल व्यवसायाचे महसुली उत्पन्न 5 लाख कोटी रुपये आहे. सौदी अराम्को रिलायन्सच्या ऑईल टू केमिकल व्यवसायात गुंतवणूक करेल. सौदी अराम्को जगातील सर्वांत मोठी तेल कंपनी आहे. रिलायन्समधील 20 टक्के शेअर्स खरेदी केल्यावर अराम्को दर दिवसाला पाच लाख बॅरल तेलाचा पुरवठा कंपनीला करेल. गुजरातच्या जामनगरमध्ये रिलायन्सचा तेल शुद्धीकरण प्रकल्प आहे. हा जगातला सर्वांत मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प असून त्याची क्षमता 14 लाख बॅरल इतकी आहे.