Breaking News

पूरग्रस्त भागातील शाळांना 16 ऑगस्टपर्यंत सुटी

कोल्हापूर
अद्याप जिल्ह्यासह शहरातील पूरस्थिती आटोक्यात न आल्याने पूरग्रस्त भागातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना 16 ऑगस्टपर्यंत सुटी राहणार असल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी अधिकृत पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. कोल्हापुरात 3 ऑगस्टपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. दोन दिवसाच्या पावसामुळे शहर व जिल्ह्यात महापूर आल्याने अनेक शाळांकडे जाणारे मार्ग पाण्याखाली आले होते.
तर काही भागातील शाळाही महापुराच्या तडाख्यात सापडल्या. पूरबाधित कुटुंबांना स्थलांतर करावे लागले. यामुळे 5 ऑगस्ट रोजी पुढचे दोन दिवस शाळा व कॉलेजला सुटी देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते. पुराची तीव्रता कमी न झाल्याने सुटीचा कालावधी टप्प्याटप्प्याने वाढवण्यात आला होता. दरम्यान, रविवारपासून पावसाचा जोर कमी असला तरी अद्याप शहर व जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पाणी आहे. स्थलांतरित कुटुंबांचे वास्तव्य छावणीत तसेच नातेवाइकांकडे आहे. त्यामुळे शाळा, कॉलेजच्या सुटीत 16 ऑगस्टपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे पत्र जिल्ह्यातील सर्व शाळा, कॉलेज व्यवस्थापनाला पाठवण्यात आले आहे.