Breaking News

विधानसभेसाठी 18 हजार मतदान यंत्रे शहरात दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी
 राज्यात ऑक्टोबरमध्ये विधासभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी तामिळनाडू राज्यातून 18 हजार मतदान यंत्रे नगरमध्ये दाखल झाली आहेत. ही सर्व यंत्रे एमआयडीसी येथील वखार महामंडळाच्या गोदामात उतरविण्यात आली आहेत. राज्यात ऑक्टोबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होण्याची  चिन्हे आहेत. त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे.
  त्यासाठी मतदान यंत्रांची जमवाजमव सुरू करण्यात आलेली पहावयास मिळाली. लोकसभा निवडणुकीत वापरलेली मतदानयंत्रे येथेच असली तरी ती यंत्रे विधानसभेला वापरली जाणार नाहीत. त्यामुळे विधानसभेसाठी तामिळनाडू मधील मतदानयंत्रे मागवण्यात आली आहेत. विधानसभेसाठी भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीचे 7 हजार बॅलेट युनिट, 5 हजार 230 कंट्रोल युनिट, तर 5 हजार 450 व्हीव्हीपॅट आदी सुमारे 18 हजार यंत्रे लागणार आहेत. ही यंत्रे तामिळनाडू राज्यातील वेल्लोर जिल्ह्यातून घेऊन येण्याचे आदेश केंद्रीय आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार उपजिल्हाधिकारी उदय किसवे, पुनर्वसन विभागाचे तहसीलदार महेश शेलार या दोन अधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी-कर्मचार्‍यांची दोन पथके ही यंत्रे आणण्यासाठी गेली होती.
हे अधिकारी रविवारी (दि.11) ही सर्व यंत्रे घेऊन पोलिस बंदोबस्तात नगरला दाखल झाले. आता ही यंत्रे एमआयडीसीमधील वखार महामंडळाच्या गोदामात ठेवली गेली आहेत. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी गोदामाला भेट देऊन पाहणी केली. लवकरच या मतदानयंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी केली जाणार आहे.जिल्ह्यात सुमारे साडेतीन हजार मतदान केंद्र आहेत. त्याच्या दुप्पट मतदान यंत्र प्रशासनाने मागवले आहेत.