Breaking News

दिव्यागांच्या टी-20 स्पर्धेत भारत विश्‍वविजेता

अंतिम सामन्यात इंग्लंडवर 36 धावांनी मात

वॉर्सेस्टर
दिव्यांग टी 20 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये यजमान इंग्लंडला पराभूत करून भारताच्या संघाने विजतेपद पटकावलं. भारताच्या रवींद्र संतेचं अर्धशतक आणि कपणाल फणसे यांच्या अष्टपैलू खेळीच्या जो धावा केल्या होत्या. भारताकडून रवींद्र संतेनं 53 धावा तर कुणाल फणसेनं 36 धावांची खेळी केली. इंग्लंडच्या लिआम ओब्रायनने 35 धावांत 2 गडी बाद केले. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 20 षटकांत 9 बाद 144 धावांपर्यंत मजल मारू शकला.
सामन्यात एकवेळ 11 व्या षटकाअखेर इंग्लंडची स्थिती एक बाद 90 अशी भक्कम होती. पण 44 धावांवर अँगस ब्राउन बाद झाला आणि सामन्याचे पारडे भारताच्या बाजूने झुकले. सनी गोयाटने टाकलेले सामन्यातील 13 वे षटक निर्णायक ठरले. यात कलम फ्लिन (28) हा पहिल्याच चेंडूवर बाद झाला. दोन चेंडूनंतर लियाम ब्राऊन धावबाद झाला. पुढच्या षटकात लियाम थॉमस व इंग्लंडचा कर्णधार नेर्नसुध्दा बाद झाला आणि इंग्लंडची अवस्था 6 बाद 105 अशी झाली. इंग्लंडने 22 चेंडूंच्या अंतरात पाच गडी गमावले. त्याआधी भारताच्या डावात कर्णधार विक्रांत केणीने 29 आणि कुणाल फणसेने 36 धावा करताना दुसर्‍या गड्यासाठी 47 धावांची भागिदारी केली. त्यानंतर रविंद्रच्या अर्धशतकी खेळीने भारतीय डावाला आकार दिला. सुगणेश महेंद्रन याने 11 चेंडूतच चार षटकारांसह 33 धावांची झंझावाती खेळी केली. त्यामुळे भारताने शेवटच्या सात षटकात 95 धावांची भर घातली. या पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार नेर्न म्हणाला की, आम्ही पूर्ण जोर लावून खेळलो. आमचा संघ तरुण खेळाडूंचा होता. आमचे दोन खेळाडू तर विशीच्या आतील आहेत आणि भारताचा संघ वयाने मोठ्या खेळाडूंचा होता. टेलिव्हिजनवर सामने बघून त्यांनी सराव केला आहे. या स्पर्धेतही भारताने शेवटच्या साखळी सामन्यात पाकिस्तानला आठ गडी राखून मात दिली होती. सहा देशांच्या या टी-20 स्पर्धेत भारत व इंग्लंडशिवाय पाकिस्तान, बांगलादेश, अफगणिस्तान व झिम्बाब्वेचे संघ सहभागी झाले होते.


संक्षिप्त धावफलक भारत 
20 षटकांत 7 बाद 180 (रवींद्र संते 53, कुणाल फणसे 36; लिआम ओ’ब्राएन 2/35) विजयी वि. इंग्लंड : 20 षटकांत 9 बाद 144 (अँगुस ब्राऊन 44, कॅलम फ्लीन 28; कुणाल फणसे 2/15, सनी गोयत 2/23).