Breaking News

तटरक्षक दलाच्या जहाजाला आग, 28 जणांना वाचवण्यात यश

विशाखापट्टणम्
येथे तटरक्षक दलाच्या जहाजाला आग लागली. जहाजाला आग लागल्यानंतर खलाशांनी जीव वाचवण्यासाठी समुद्रात उड्या मारल्या. त्यापैकी 28 जणांना वाचवण्यात यश आले असून एक जण बेपत्ता आहे. बेपत्ता खलाशाचा शोध घेण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास गस्ती पथकातील कोस्टल जगुआर या जहाजाला आग लागली. आग लागण्याआधी एक मोठा स्फोट झाल्याचा आवाज आला. या वेळी जहाजावर असणार्‍या खलाशांनी जीव वाचवण्यासाठी थेट समुद्रात उड्या घेतल्या. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथून जवळ असणार्‍या तटरक्षक दलाच्या जहाजाला बचावकार्यासाठी पाठवण्यात आले. 28 जणांना वाचवण्यात यश मिळाले असून एकजण बेपत्ता आहे. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. बचावकार्यासाठी भारतीय तटरक्षक दलाचे जहाज समुद्र पेहरेदार आणि हेलिकॉप्टरची मदतही घेतली जात आहे.