Breaking News

बेस्ट पासधारकांत 29 हजारांची घट

मुंबई
 भाडेकपातीनंतर बेस्टची तिकीटविक्री वाढली असली तरी पासधारकांची संख्या 29 हजारांनी कमी झाली आहे. प्रवासी दररोज तिकीट काढून प्रवास करण्यास पसंती देत असल्याने पासविक्री कमी झाल्याचे बेस्टचे म्हणणे आहे. दरम्यान, तिकीट दरकपातीचा महिनाभर आढावा घेतल्यानंतर बेस्टकडून प्रवाशांच्या मागणीनुसार नवीन बसमार्ग सुरू करण्यात आले आहेत.
9 जुलैपासून बेस्ट उपक्रमाने भाडेकपात केली. पाच किलोमीटरसाठी किमान भाडे पाच रुपये, तर वातानुकूलितचे भाडे सहा रुपये झाले. तिकिटांबरोबरच पासच्या दरातही कपात करण्यात आली. पूर्वी दोन, चार किलोमीटर याप्रमाणे टप्पे मोजले जात. चार किलोमीटपर्यंतच्या प्रवासासाठी 400 रुपयांहून अधिक रक्कम बस पासकरिता मोजावी लागत होती. दरकपातीनंतर बस पाससाठी 5, 10, 15 आणि 15 किलोमीटरहून अधिक असे टप्पे ठरले. टप्प्यांचे अंतर वाढवूनही पासधारकाची संख्या कमी झाली आहे.
भाडेकपातीपूर्वी बेस्टचे 1 लाख 73 हजार पासधारक होते. आता सरासरी पासधारक 1 लाख 44 हजार इतके झाल्याची माहिती बेस्टने दिली. थोडक्यात प्रवासी बस पासऐवजी दररोज तिकीट काढून प्रवास करण्याला प्राधान्य देत आहेत.
रेल्वे मार्गालगत तीन नवीन मार्ग
अधिकाधिक प्रवाशांना बेस्टकडे वळविण्याकरिता प्रशासनाने रेल्वे मार्गालगत नवीन बसमार्ग सुरू केले आहेत. सात रस्ता (जेकब सर्कल) ते सीएसएमटी या दरम्यान तीन नवीन मार्ग बेस्टने सुरू केले आहेत. याचा पाच हजार प्रवाशांना फायदा होईल असा अंदाज आहे. काही लांब पल्ल्याच्या बसमार्गावरही बसफेर्‍या देण्याचा बेस्टचा विचार आहे. प्रवाशांच्या प्रतिसादाचा आढावा घेऊन गर्दीच्या बसमार्गावर सेवा दिली जात आहे.
प्रवासभाडे कपात करण्यापूर्वी बेस्टचे प्रतिदिन सरासरी 19 लाख प्रवासी होते. दर दैनदिन उत्पन्न सरासरी 2 कोटी 36 लाख होते. प्रवास भाड्यात कपात केल्यानंतर प्रवासी संख्या 27 लाख एवढी झाली. मात्र उत्पन्नात कपात झाली असून 1 कोटी 75 लाख उत्पन्न मिळाले आहे.