Breaking News

मध्य रेल्वेच्या टीसीने प्रवाशांचे 33 लाख रुपये व्हिडिओ गेमवर उडवले

मुंबई
मध्य रेल्वेच्या एका टीसीला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. सहा ऑगस्ट रोजी अटक करण्यात आलेल्या भुपेंद्र विद्या या टीसीने प्रवाशांकडून दंड म्हणून वसूल केलेली 33 लाखांच्या रकमेचा अपहार केल्याचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे या टीसीने आपण हे पैसे व्हिडिओ गेमवर उडवल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
या प्रकरणासंदर्भात रेल्वे पोलीस खात्यातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील सहाय्यक निरीक्षक नवनाथ रुपवते यांनी अधिक माहिती दिली. भुपेंद्रने दिलेल्या जबाबामध्ये त्याला व्हिडिओ गेम्सचे व्यसन असल्याची कबुली दिली आहे. अयोग्यरित्या प्रवाश्यांकडून जमा केलेले पैसे त्याने ठाण्यामधील एका व्हिडिओ पार्लरमध्ये खर्च केल्याचे कबुली जबाबामध्ये म्हटले आहे. ठाण्यातील व्हिडिओ गेम पार्लरच्या मालकाने भुपेंद्र खरं बोलत असल्याचे पोलिसांना सांगितले आहे, अशी माहिती रुपवते यांनी दिली आहे.
आधी तो स्वत:चा पगार व्हिडिओ गेम्स खेळण्यासाठी खर्च करायचा. मात्र हळूहळू त्याचे गेम खेळण्याचे प्रमाण वाढल्यानंतर त्याला पगाराचे पैसे कमी पडू लगाले. त्यानंतर तो तिकिटाशिवाय प्रवास करणार्‍या प्रवाशांना पकडल्यानंतर त्यांच्याकडून पावतीशिवाय पैसे गोळा करु लागला, असं रुपवते यांनी सांगितलं. गोळा केलेले पैसे आणि जमा केलेल्या पैश्यांमधील तफावतीमधील फरक लक्षात येऊ नये म्हणून भुपेंद्र पैशांचा हिशोब ठेवणार्‍या वरिष्ठांनाही लाच द्यायचा असं पोलिसांनी स्पष्ट केलं.
मात्र सीएसटीएमटी येथे कार्यरत असणार्‍या विभागीय मुख्य निरीक्षक सुशीलकुमार भागाने यांनी पैशांमधील घोळ लक्षात आला. त्यांनी डिसेंबर 2018 मध्ये या प्रकरणी भुपेंद्रविरोधात रेल्वे पोलिसांकडे एफआयआर दाखल केली. ही तक्रार दाखल झाल्यानंतर भुपेंद्रवर चौकशी होईपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली. तपास सुरु झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. भुपेंद्रला आता नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं आहे.
याप्रकरणात भुपेंद्रला अटक करण्यात आलेली नाही. त्याऐवजी रेल्वेने त्याला पैसे परत करण्यास सांगितले आहे. मात्र भुपेंद्रने केवळ पाच लाख परत केले आहेत. त्यामुळेच त्याला सहा ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध बनाव करणे आणि फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.