Breaking News

काश्मिरी पंडित, डोगरा, शीखांचा कलम 370 रद्द करण्यास विरोध

श्रीनगर
काश्मिरी पंडित, डोगरा आणि शीख समुदायातील काही गटांनी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध केला आहे.

या तीनही समूहातील काहींनी तसे पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यावर या गटांमधील 64 दिग्गज मंडळींनी स्वाक्षर्‍या केल्या आहेत, असे एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे. प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ उपेंद्र कौल, एअर व्हाइस मार्शल (निवृत्त) कपिल काक, पत्रकार प्रदीप मॅगेझिन, शारदा उग्रा आणि अनुराधा भासिन या दिग्गजांसह विद्यार्थी, कलाकार आदींच्या या पत्रकावर स्वाक्षर्‍या आहेत. केंद्राने हा निर्णय बळाचा वापर करून घेतला आहे. जम्मू-काश्मीरच्या लोकांना दिलेली आश्‍वासने पाळली नाहीत आणि हा निर्णय असंवैधानिक आहे. जम्मू-काश्मीर विधानसभेचे मत किंवा मंजुरी न घेताच केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी पत्रकात नमूद केले आहे.

जम्मू-काश्मीरमधील लोकांना लादलेल्या बंधनातून तात्काळ मुक्त करण्यात यावे, अशी आमची मागणी आहे. मनमानी आणि अवैधपणे अटक करण्यात आलेल्या राजकीय पक्षांच्या नेत्यांची सुटका करण्यात यावी, असे या गटांनी पत्रकात म्हटले आहे. राज्याच्या विभाजनाने आम्ही खूप दुःखी झालो आहोत. अशा काळात आपल्या सर्वांना एकत्र राहायला हवे, असे आवाहनही त्यांनी राजकीय पक्षांना केले आहे. जात-धर्म, सांस्कृतिक आधारावर विभाजन करण्याचा प्रयत्न होत असेल, तर आम्ही त्याला विरोध करू, असा निर्धारही त्यांनी केला.