Breaking News

काश्मिरात हिंदू असते, तर नसते हटवले कलम 370 : पी. चिदंबरम

चेन्नई
जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या केंद्रातील भाजप सरकारच्या निर्णयावर माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी सडकून टीका केली आहे. जम्मू-काश्मीर हिंदुबहुल राज्य असते, तर ‘भगवा पार्टी’ने या राज्याला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवले नसते, असे ते म्हणाले.

भाजपने ताकदीचा गैरवापर करून जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केले, असा आरोप चिदंबरम यांनी केला. जम्मू-काश्मीर अस्थिर असून, आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था त्याबाबत वृत्तांकन करत आहेत; मात्र भारतीय प्रसारमाध्यमे या सद्यस्थितीबाबत वृत्तांकन करताना दिसत नाहीत. काश्मीरमधील परिस्थिती निवळली आहे, असा दावा भाजप करत आहे. जर भारतीय प्रसारमाध्यमे काश्मीरमधील अस्थिरतेचे वृत्तांकन करत नसतील, तर याचा अर्थ तेथील परिस्थिती स्थिर आहे असा होतो का, असा सवालही त्यांनी केला. चिदंबरम यांनी देशातील सात राज्यांतील सत्ताधारी प्रादेशिक पक्षांवरही टीकास्त्र सोडले.
विरोधी पक्षांनी भीतीमुळेच राज्यसभेत भाजपच्या या निर्णयाविरोधात आम्हाला सहकार्य केले नाही. लोकसभेत आमच्याकडे बहुमत नाही हे आम्हाला ठावूक आहे; मात्र डीएमके, वायएसआर काँग्रेस, टीआरएस, बीजेडी, आप, टीएमसी, जेडीयू या सात पक्षांनी सहकार्य केले असते, तर विरोधी पक्षाला राज्यसभेत बहुमत मिळू शकले असते. हे निराशाजनक आहे, असा संताप चिदंबरम यांनी व्यक्त केला. जम्मू-काश्मीर हिंदूबहुल राज्य असते, तर भाजपने कधीच असा निर्णय घेतला नसता. मुस्लिमबहुल राज्य असल्यानेच भाजपने हा निर्णय घेतला, असा गंभीर आरोपही चिदंबरम यांनी केला.