Breaking News

पालघर: जव्हारमध्ये रस्ता गेला वाहून, 40 गावपाड्यांचा संपर्क तुटला

जव्हार (पालघर)
विद्यार्थ्यांचे, नागरिकांचे तसेच रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना पाच किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.
आठवड्याभरापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे येथील रस्ता वाहून गेला आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात मुसळधार पावसामुळे चोथ्याचीवाडी जवळचा रस्ता वाहून गेला असून 35 ते 40 गावपड्यांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे, नागरिकांचे तसेच रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना पाच किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. दरम्यान, नागरिकांनी लवकरात लवकर पर्यायी रस्ता करून देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
गेल्या आठवडाभरापासून पावसाची संततधार सुरु असल्याने जव्हार शहरातील पर्यटनस्थळ असलेल्या हनुमान पॉईंटच्या खाली असलेल्या चोथ्याचीवाडी जवळचा संपूर्ण रस्ताच वाहून गेला आहे. रस्ता वाहून गेल्याने 20 ते 25 फुटांचा खड्डा पडला आहे. त्यामुळे झाप, साकूर हे दोन्ही मार्ग बंद झाले आहेत. तसेच साकूर रामखिंड मार्गे जाणारा वाडा-ठाणे मार्गही बंद झाला आहे. त्यामुळे झाप-साकूर भागातील  35 गावंपाड्यांचा संपर्क तुटला आहे.
झाप-साकूर या दोन्ही मार्गांच्या परिसरात साकूर आणि झाप अशा दोन आश्रम शाळा आहेत. तर साकूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून, झाप येथे आरोग्य उपकेंद्र आहे. मात्र, या भागाकडे जाणारा रस्ताच बंद झाल्याने रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. तसेच जव्हार येथे शाळा, कॉलेजला जाणार्‍या विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली आहे. याबाबत प्रशासनाने लवकरात लवकर रस्ता तयार करून मार्ग सुरु करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.