Breaking News

महापुरात आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू

पुणे / प्रतिनिधी 
कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुण्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण बेपत्ता आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुरामुळे सांगलीत 19, कोल्हापुरात सहा, सातारा आणि पुण्यात प्रत्येकी सात आणि सोलापूरमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातार्‍यात प्रत्येकी एक अशा तीन व्यक्ती बेपत्ता आहेत. ब्रह्मनाळमध्ये आज पाच मृतदेह सापडल्याचे म्हैसेकर यांनी सांगितले. कोल्हापुरात दोन लाख 45 हजार 229 जणांचे स्थलांतर करण्यात आले असून सांगलीत 4 लाख 41 हजार 845 जणांचे स्थलांतर करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. सांगलीत पाणी ओसरायला सुरुवात झाली असून सांगलीतील पाण्याची पातळी 56 फुटावरून 53 फुटावर आल्याचेही त्यांनी सांगितले. सांगली आणि कोल्हापूरमधील पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी पाच हजार रुपये रोख दिले जाणार आहेत. उर्वरित रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या पुरामुळे सांगली, कोल्हापूर आणि सातार्‍यात एकूण 50 गाई, 42 म्हशी, 23 वासरे, 58 शेळ्या 11 हजार 100 कोंबड्यांचा मृत्यू झाला असून एकूण 25 लाख 17 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हेल्पलाइन नंबरही जारी करण्यात आला आहे. कोल्हापूरसाठी हेल्पलाईन क्रमांक 7875769103 व सांगली जिल्ह्यासाठी 7875769449 हा हेल्पलाइन नंबर सुरू करण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्यामध्ये 29 प्रमुख राज्यमार्ग, 38 प्रमुख जिल्हामार्ग असे 67 रस्ते आणि 37 पूल बंद ठेवण्यात आले आहेत. कोल्हापूरमध्ये 29 राज्यमार्ग आणि 58 प्रमुख जिल्हामार्ग असे 87 रस्ते आणि 37 पूल पाण्याखाली असल्याने बंद ठेवण्यात आल्याचे म्हैसेकर यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातील पाणशेत घोळ रस्ता (प्रमुख जिल्हा मार्ग क्र.141) दरड कोसळल्यामुळे बंद आहे. खेड तालुक्यातील मंदोशी गावाजवळील घाटरस्ता शिरगाव-मंदोशी-तळेघर राज्यमार्ग क्र. 113 खचल्यामुळे बंद आहे व भोर तालुक्यातील वरंधा घाटरस्ता बाणकोट-महाड-वरंधा-भोर-शिरवळ प्रमुख राज्यमार्ग क्रमांक 15 ही खचल्यामुळे बंद आहे.

आकडे बोलतात
* सांगलीत 51 बचाव पथके, 95 बोटी 269 जवान कार्यरत
* कोल्हापुरात 53 बचाव पथके, 87 बोटी 501 जवान
* सांगली 80, कोल्हापूरमध्ये 150 आणि सातार्‍यात 72 अशी 302 वैद्यकीय पथके
* प्रतिकुटुंबांना 10 किलो गहू व 10 किलो तांदूळ पुरविणार
* कोल्हापूर जिल्ह्यात गोकुळ डेअरी मार्फत 24 तास मोफत दूध पुरवठा
* तीन लाख 29 हजार 603 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत